काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुफळी भाजपा-सेनेच्या पथ्यावर पडणार ?

0

रावेर । जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला रंगत येण्यास सुरुवात झाली असली तर बहुतेक गटामध्ये प्रतिष्ठेची लढत बघायला मिळत आहे. एक गटात सरळ लढत तर बाकी ठिकाणी तिरंगी लढत असून भाजपा, शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढती गटात आहे तर पंचायत समितीच्या सर्व गणात तिरंगीच लढती असून प्रतिष्ठेेच्या लढतीत जिल्हा परिषदेत असून तिनही पक्षांना निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे.

जिल्ह्यात भाजपाने सर्व ठिकाणी उमेदवार दिले असून आजी, माजी व आताच तिकीट कापलेले सर्व पदाधिकारी, सदस्य पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्थानिक पातळीवर फिरत आहे. तर शिवसेनेने यंदा निवडून येणार्‍याच ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उतरविले आहे तर विवरा-वाघोदा गटामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने उघड बंडखोरी करुन पक्षाच्या चिन्हावर चौरंगी लढत दिली. त्यामुळे आघाडी जरी दिसत असली तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील मनोमनी व नाराजी भाजपा-सेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची दाट शक्यता आहे.

विवरा-वाघोदा गटावरुन संघर्षाची ठिणगी

जागा वाटपावरुन तालुक्यात चार काँग्रेस, दोन राष्ट्रवादी समांतर गण अशी वाटाघाटी झाली असतांना राष्ट्रवादीने ए.बी. फॉर्म दिलाच कसा? या प्रश्‍नावरुन काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, तालुकाध्यक्ष अर्जुन जाधव व इतर पदाधिकारी नाराज आहे. तर निंभोरा-तांदलवाडी येथील अपक्ष उमेदवारांना काँग्रेस पुरस्कृत करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे आधी आघाडी करायची आणि नंतर कुरघोड्या करुन स्वतंत्र उमेदवार द्यायचे त्यामुळे दोन्ही गटाची दोन्ही पक्षांसमोरील कार्यकर्त्यांना आघाडी बरोबर फिरायचे कि स्वतंत्र हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथून आत्माराम कोळी (राष्ट्रवादी), जफरउल्ला जमादार (काँग्रेस), मुबारक तडवी (शिवसेना), गोमती बारेला भाजपाचे उमेदवार आहे. तालुक्यात एकमेव चौरंगी लढत या गटात होत आहे तर विवरा गणातून अजाबराव पाटील (भाजपा), योगेश पाटील (राष्ट्रवादी), योगेश महाजन (शिवसेना)तर्फे उमेदवार आहे. तर वाघोदा गणातून सुभाष गाढे (राष्ट्रवादी), साहेबराव ठाकणे (शिवसेना) तर योगिता वानखेडे (भाजपाचे) तर उमदेवार आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष व सरचिटणीस या गटातले असल्याने ही लढत सुध्दा प्रतिष्ठेची आहे.
गणामध्ये अतुल महाजन अपक्ष उमेदवारी आहे.

लढत गटाची तर प्रतिष्ठा नेत्यांची : यंदाच्या गट व गणांच्या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा नेत्यांनी जास्त मनावर घेतलेले दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादीचे अरुण पाटील तर भाजपाचे आमदार हरिभाऊ जावळे या तिघेही 2019 च्या विधानसभेची चाचपणी यंदाच्या निवडणुकीत करताय परंतु राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसमोर पक्षाचाच उमेदवार दिल्याने आधीत बिघाडीचे छुपे तंत्र वापरतांना दिसत आहे. मतदानाला अजून सहा दिवस बाकी असतांना अजून पुढे काय रणनिती दोन्ही माजी आमदार करतात. यावर बरेच समिकरण अवलंबून राहणार आहे.

ऐनपूर-खिरवड गटात कांटे की टक्कर

ऐनपूर-खिरवड हा गट मराठा बहुल असून या खालोखाल आणि निर्णायक मतदान गुजर समाजाचे आहेे. त्यामुळे भाजाने रंजना पाटील तर शिवसेनेने सुलोचना पाटील या दोघेही मराठ्यांना उमेदवारी देवून राष्ट्रवादीच्या उमेदवार बेबाबाई पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे तर खिरवड गणातून गनी तडवी (शिवसेना), जुम्मा तडवी (भाजपा) तर राष्ट्रवादीकडून फकिरा तडवी आहे तर ऐनपूर गणातून जितेंद्र पाटील (भाजपा), रविंद्र महाजन (शिवसेना), गणेश बोरसे (राष्ट्रवादी) आणि ऐनपुर गणात राज सुवर्णे (काँगे्रस पुरस्कृत अपक्ष) कडून गणासाठी स्वतः तर गटासाठी वरिष्ठांना मदत करत आहे.

निंभोरा-तांदलवाडी गटात चुरशीची लढत

निंभोरा-तांदलवाडी गट आमदार एकनाथराव खडसे यांच्या मतदार संघात येतो. तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून सुध्दा याकडे बघितले जाते. विद्यमान सदस्या पूनम पाटील यांचे पत्ते कापून पक्षाने आमदार एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ही लढत स्वतः प्रतिष्ठेची समजून भास्कर पाटील यांना उमेदवार केले आहे तर इकडे राष्ट्रवादीने सुनिल कोंडे यांना उमेदवारी दिली असून मराठा बहुल गटातील लढतीवर पुढील तालुक्याचे राजकारण रंगणार आहे तर निंभोरा गणासाठी ज्ञानदेव नेमाडे (भाजपा), दिनेश पाटील (शिवसेना), दिपक पाटील (राष्ट्रवादी) चे उमेदवार आहे. निंभोरा गटासाठी अपक्ष उमेदवार किशोर पाटील यांना काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. तर तांदलवाडी गणात कविता कोळी (भाजपा), मनिषा ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी तर तृणाली खाचणे (राष्ट्रवादी) तर कल्पना पाटील शिवसेनेच्या उमेदवार असून गणात स्वतःसाठी तर गटात पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करत आहे.

थोरगव्हाण-मस्कावदेत तिरंगी लढत

थोरगव्हाण-मस्कावद गट सुध्दा आमदार एकनाथराव खडसे यांच्या मतदार संघात येत असल्याने येथून भाजपाचा उमेदवार कैलास सरोदे यांना निवडून आणण्याचे आवाहन आहे तर काँग्रेसने हा गट आघाडीतून मिळून हितेंद्र पाटील तर शिवसेनेने कमलाकर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या गटातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी चंदू पाटील प्रयत्नशिल आहे तर काँग्रेसच्या उमेदवारीवरुन दोन्हीसमोर कडवे आवाहन आहे तर थोरगव्हाण गणातून रुपाली कोळी (शिवसेना), तृप्ती तायडे (काँग्रेस), हिमलता पाटील (भाजपा) कडून आहे तर मस्कावद गणातून अनिता चौधरी (भाजपा), साधना महाजन (काँग्रेस), माधुरी सपकाळे (शिवसेने)तर्फे रिंगणात असून तिरंगी लढती देत आहे.

चिनावल-खिरोदा गटात कांटे की सरळ लढत

चिनावल-खिरोदा गट यापूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होता तर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे रहिवास या गटातला असून काँग्रेसकडे हा गट ठेवण्यासाठी चौधरी उमेदवाराच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले असून सुरेखा पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली असून भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष मिलींद वायकुळे यांच्या पत्नी पुजा वायकुळे (भाजपा) समोर त्यांची सरळ लढत आहे. चिनावल गणातून माधुरी नेमाडे (भाजपा), संगीता महाजन (काँग्रेस), खिरोदा गणातून संगिता चौधरी (भाजपा), प्रतिभा बोरवले (काँग्रेस) तर्फे रिंगणात आहे.

पाल-केर्‍हाळा राखण्यासाठी भाजपाचे प्रयत्न

पाल-केर्‍हाळा गटातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे नातलग अमोल पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील (भाजपा) तर्फे उमेदवार असून त्यांच्यासमोर आव्हान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन जाधव याच्या पत्नी सुशिला जाधव (काँग्रेस) रिंगणात असून शिवसेनेतर्फे मानसी पवार रिंगणात आहे. तालुक्यात ही लढत सुध्दा लक्षवेधी आहे. शिक्षण सभापती सुरेश धनके व इतर पदाधिकारी भाजपाकडे राखण्यासाठी प्रयत्न करत आहे तर माजी आमदार शिरीष चौधरी सुध्दा या लढतीसाठी काँग्रेसकडून प्रचार करत असून शिवसेनेने ही लढत तिरंगी झाली आहे तर पाल गणातून पी.के. महाजन (भाजपा), रविंद्र महाजन (शिवसेना) तर काँग्रेसकडून देविदास हळपे तर केर्‍हाळा गणातून अलका पाटील (काँग्रेस), धनश्री जावळे (भाजपा), सुनिता पाटील (शिवसेने) कडून रिंगणात आहे.

– शालिक महाजन
9021960477