काँग्रेस, राष्ट्रवादीतील तिढा सुटला

0

मुंबई : राज्य विधिमंडळात इंदिरा गांधी यांचे अभिनंदन आधी करायचे की शरद पवार यांचे, यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादावर सोमवारी तोडगा निघाला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सुचवलेल्या पर्यायाला अंतीम स्वरूप देण्यावर मुख्यमंत्र्यांनीही शिक्कामोर्तब केले. ज्यांच्या जयंती वा पुण्यतिथीला शंभर वर्षे झाली किंवा ज्यांच्या संसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाली, अशा नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव येत्या पाच ऑगस्टला चर्चेला येणार होता. इंदिरा गांधी, शरद पवार, गणपतराव देशमुख, पं. दीनदयाळ उपाध्याय, बाळासाहेब देसाई आणि नानाजी देशमुख यांचा गोरव यानिमित्ताने होणार होता. या प्रस्तावात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पहिले असावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरला. त्याचवेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव पहिले असावे अशी काँग्रेसची भूमिका होती. त्यावरून या दोन्ही पक्षांनी रविवारी स्वतंत्र चूल मांडली होती. विरोधकांमध्ये फूट पडल्यामुळे सत्ताधारी खूष झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून मार्ग काढला जाईल, असे जाहीर केले. यानुसार यामुळे या प्रकरणी सन्माननीय तोडगा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीत सर्वमान्य निर्णय
सोमवारी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे व धनंजय मुंडे यांच्या समवेत काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आदींनी चर्चा करून तोडगा काढला. हा तोडगा विधान परिषदेचे सभापती व विधानसभेचे अध्यक्ष तसेच सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवण्यात आला.

त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच धनंजय मुंडे यांनी चर्चा करून तोडग्याला अंतीम स्वरूप दिले. यानुसार आता पाच ऑगस्टला शरद पवार तसेच गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव चर्चेला येईल. त्यानंतर क्रांतीदिनी म्हणजे नऊ ऑगस्टला इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव चर्चेला येईल. दुसर्‍या दिवशी, 10 ऑगस्टला पं. दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख व बाळासाहेब देसाई यांच्या अभिनंदनांचा प्रस्ताव चर्चेला आणण्यात येणार आहे.