६ फेब्रुवारीला होणार मुंबईत दोन्ही पक्षाची संयुक्त बैठक
मुंबई:- भाजपविरोधात देशभरात विरोधी पक्ष एकवटत असल्याचे चित्र आहे. देशभरात विरोधी पक्ष एकत्रित येत असतानाच महाराष्ट्रात देखील मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन आगामी निवडणुका लढविणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नुकतीच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विरोधकांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर आता राज्यात देखील 6 फेब्रुवारीला मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते एकत्र येत असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली जाणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अन्य कुठले पक्ष येणार याबाबत मात्र अद्याप माहिती कळू शकलेली नाही.
पूर्वआढावा घेण्यासाठी बैठक
शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्याच्या आशा वाटू लागल्या आहेत. मात्र एकत्र निवडणुकांना सामोरे गेले तरच हे शक्य आहे, याची जाणीव झाली आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये वेगळी चूल मांडण्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला असून आता वेळीच राजकीय शहाणपण सुचल्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकत्र येण्याची हाक दिली आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस सुखावली आहे. परिणामी एकत्र येण्यासाठीच्या तयारीला त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. २०१९च्या निवडणूकीच्या तयारीचा पूर्वआढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचे दोघांकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षानी मिळून नुकतीच संविधान यात्रा काढली होती.
दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी दिला दुजोरा
दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्याच्या वृत्ताला दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानी दुजोरा दिला आहे. एकत्र येण्यासाठी बैठक होत आहे. यामधून सत्ताधाऱ्यांसमोर सशक्त पर्याय उभा होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करत आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.