धुळे । महात्मा गांधीजींचे विचार संपविण्यासाठी त्यांची हत्या केली आणि आजही त्यांच्या विचारांची आणि तत्वज्ञानाची हत्या केली जात आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिंतनशील बनुन काँग्रेसच्या विचारधारेला मनामनात रुजविण्याची गरज आहे, असे आवाहन अखिल भारतीय पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय काँग्रेस पक्षांतर्गत राजीव गांधी पंचायती राज संघटनच्यावतीने पंचायती राज कार्यकर्ता चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. धुळे येथील नकाणेजवळील दुलारी गार्डन येथे काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसाच्या विभागीय चिंतन शिबीराला प्रारंभ झाला.
काँग्रेसच्या इतिहासाला उजाळा द्यावा
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतन आणि विचार हरविल्याचे दिसत आहेत. सभेतील भाषणे, प्रचार, घोषणा हे नेहमीचेच झाले आहे. गांधीजींच्या धर्मनिरपेक्ष विचाराने काँग्रेस पक्ष उभा रहिला आहे. त्यामुळे गांधीजीचे विचार आणि तत्वज्ञान कार्यकर्त्यांमध्ये रुजावेत व ते प्रत्येक माणसापर्यंत पोहचविता यावेत म्हणून अशी चिंतन शिबीरे महत्वाची आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंतनशील होवून काँग्रेसच्या इतिहासाला उजाळा द्यावा. काँग्रेसच्याच विचारांनी देशातील स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. काँग्रेस कार्यकर्ता गांधीजींच्या विचारांपासून दुर चालला असे खेदाने म्हणाले लागत आहे, म्हणून हे विचार मनामनात रुजविणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
देशात आता परिवर्तनाचे वारे…
आ.कुणाल पाटील यांनी, काँग्रेस पक्षाला बलिदानाचा इतिहास आहे. देश उभा करण्यात आणि घडविण्यात काँग्रेसचे मोठे योगदान असून धर्मनिरपेक्ष काँग्रेसची संस्कृती आहे. देशात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून 2019 मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान होतील. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे तत्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहचवावेत, असे सांगितले. तर माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी, गांधीजींची पुस्तके प्रत्येकाने वाचावित त्यांच्या विचारानेच देश समृध्द झाला आहे. काँग्रेसने 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती करुन स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट केले. स्वातंत्र मिळाल्यानंतर देशात अन्नधान्न्याचा तुटवडा होता, दारिद्रयाचे प्रमाण जास्त होते. अनेक अडचणींवर मात करीत काँग्रेसने देशात विकासात क्रांती घडविली. म्हणूनच आज देशाची प्रगती डोळ्यासमोर दिसते, असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
माजीमंत्री हेमंत देशमुख, आ. कुणाल पाटील, आ. काशिराम पावरा, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, डॉ. तुषार शेवाळे, प्रभारी गगनदिप सिंग, संयोजक योगेंद्र पाटील, रजनिकांत कड, जि.प. उपाध्यक्ष नयना गावीत, सुहास नाईक, सभापती नुतन पाटील, चेअरमन लहू पाटील, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, तालुका उपाध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, राजेंद्र देसले, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, महीला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, हर्षल साळुंके, सचिन कोठावदे उपस्थित होते.