काँग्रेस शहराध्यक्षपदाची निवड लांबणीवर

0

काँग्रेसअंतर्गत राजकारण ढवळून निघाले

पुणे । काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. प्रदेश शाखेकडून संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम अद्यापी जाहीर झाला नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवनिर्वाचित अध्यक्ष आणि कार्यकारिणी असेल असे यापूर्वी प्रदेश पदाधिकार्‍यांनी जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. किमान तीन आठवडे निवडणूक लांबली असे कळते.

अपयशाचे शिल्पकार कदम
या निवडणुकांमुळे काँग्रेसअंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षाचे नेते विश्‍वजित कदम आता पुणे सोडून सांगलीत जाणार अशा बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातच कदम यांच्याविरोधात फलकबाजी झाली. पुण्यातील काँग्रेसच्या अपयशाचे शिल्पकार कदम आहेत असा मजकूर फलकांवर होता.

या प्रकारात सारवासारव करण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषद घेतली, हा खोडसाळपणा भाजपने केला असा आरोप बागवे यांनी केला. परंतु पक्षात मात्र अप्रत्यक्षपणे एकमेकांवर आरोप चालू आहेत.

अध्यक्षपदासाठी कुरघोड्या
पक्षात अध्यक्षपदासाठी कुरघोड्या चालू आहेत. त्यात सध्या तरी बागवे यांचे पारडे जड दिसते. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा कल हा बागवे यांच्या बाजूने आहे असे बोलले जाते. तसेच पक्षात अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू आहेत. त्याप्रमाणे 2019च्या लोकसभा उमेदवारीची बीजे सध्याच्या अंतर्गत राजकारणात आहेत.

नेतृत्व करण्यास कोणी पुढे आलेले नाही
पुण्याच्या राजकारणात लक्ष घालणार अशा घोषणा अनेक नेत्यांनी केल्या; प्रत्यक्षात नेतृत्व करण्यास कोणी पुढे आलेले नाही. ठराविक लोक सध्या पक्षावर पकड ठेवू पहात आहेत. जनमानसात स्थान नसलेल्या या चौकडीला अध्यक्षांनी आवरावे अशी मागणी जाणत्या लोकांकडून केली जात आहे. मोदी सरकारच्या कर रचनेतील फोलपणा दाखवणारा कार्यक्रम पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला. अनपेक्षितपणे व्यापारीवर्गाकडून प्रतिसाद मिळाला.

युवक संघटना सक्रीय करण्याची जबाबदारी
सरकार विरोधातील असंतोष संघटित करण्यासाठी पक्षाच्या आमदार आणि नगरसेवकांनी एकत्र यायला हवे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पक्षाची पुण्यातील युवक संघटना सक्रीय करण्याची जबाबदारी कदम यांची आहे. पक्षाच्या सभासद नोंदणीत युवक किती होते? याचाही विचार व्हावा असे बोलले जाते. संघटनातील निवडणुकांत याची दाखल घेतली जाईल, असेही वरिष्ठ नेत्याने सांगितले.