काँग्रेस शहराध्यक्षाच्या पुतण्याला अटक; बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई

0
पिंपरी-चिंचवड :  विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या पुतण्याला पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. साठे यांच्या पुतण्यासह त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली असून यामध्ये दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रतिक शामराव साठे (वय 22, रा. पिंपळे निलख), बालाजी लक्ष्मण शिरमेवाड (वय 39, रा. शिवणे, पुणे) अशी दोघांची नावे आहेत.
शिवणेच्या पूलावर पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, एक तरुण शिवणे येथील शिंदे पुलावर संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे पिस्टल आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून बालाजी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल आढळून आले. यावरून त्याला अटक केली आणि कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र आणि काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांचा पुतण्या प्रतीक याच्याकडे देखील एक पिस्टल असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी प्रतीक याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडेही पिस्टल आढळून आले. पोलिसांनी तपासामध्ये एकूण दोन पिस्टल व जिवंत काडतुसे असा 1 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.