मुंबई : देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारविरोधातील संघर्ष काँग्रेस आणखी तीव्र करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
मुंबईच्या आझाद मैदानात मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या जनविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या निषेध सभेत चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारला कुठलेही आर्थिक नियोजन राहिले नसून बेसुमार करवाढ केली जात आहे. मंत्र्यांच्या परदेश दौ-यावर आणि जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असून करवाढ करून त्याचा बोजा सर्वसामांन्यावर टाकला जातोय. देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात आहे. करवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
मोदी सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे या तीन वर्षात त्यांनी देशातील जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मनमोहन सिंग सरकारने सुरु केलेल्या कामाची उद्घाटने मोदी करित आहेत. देशात हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न असून सरकारविरोधात बोलणा-यांवर खोट्या केसेस टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, देशात रोज शेतकरी आत्महत्या करित असताना सरकार कसला उत्सव साजरा करित आहे. भाजप सरकार दलित आणि अल्पसंख्याक विरोधी असून गायींना वाचवण्याच्या नावाखाली गोरगरिबांचे जीव घेतले जात आहेत. या सभेत बोलताना खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री आ. वर्षा गायकवाड, माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने जनतेची कशी फसवणूक केली आहे याचे चित्रप्रदर्शन ही आझाद मैदानात लावण्यात आले होते.