रवींद्र चव्हाण, नंदुरबार | नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसशी शिवसेनेची सेटिंग झाल्याने आता भाजप आणि काँग्रेस या दोनच प्रमुख पक्षात सरळ लढत रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यादृष्टिकोनातून काँग्रेसचे आ. चंद्रकांत रघुवंशी व भाजपच्या खा. हिना गावीत,आ. डॉ. विजयकुमार गावीत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र चौधरी यांच्यात राजकिय खल सुरू आहे. नगरपालिकेवर पुन्हा आपलीच सत्ता प्रस्थापित व्हावी यासाठी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे. तर या नगरपालिकेवर परिवर्तन घडविण्यासाठी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन तथा नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार डॉ. रवींद्र चौधरी यांनीही चांगलीच कंबर कसले असून समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणूक म्हटली म्हणजे पैशांची उलाढाल आलीच,पण या गोष्टीला दोन्ही पार्ट्या सक्षम असल्याचे बोलले जाते. मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रचाराला फार महत्त्व राहणार आहे. त्याचबरोबर मतदार नागरिकांची मानसिकता आपल्या बाजूने तयार करण्यासाठी देखील आव्हान राहणार आहे कारण सत्ताधारी काँग्रेस गटाने आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकास कामांचा आरसा समोर ठेवला आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. यामुळे भाजपाला प्रचारासाठी नवीन मुद्दा शोधावा लागणार असून किंवा विकास कामांचा मुद्दा फोडून काढण्याचे मोठे आव्हान आहे. भाजपा नेतृत्वाने तीन वर्षात शहराच्या विकासासाठी काहीच केले नाही असा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी नेहमी करतात याचाही खुलासा या निवडणुकीच्या प्रचारात खा. हिना गावीत,आ. डॉ. विजयकुमार गावित यांना पुराव्यासह करावा लागणार आहे. आरोप प्रत्यारोपांच्या ़फैरी झाडण्यापेक्षा नंदुरबार शहरातील जनतेसाठी पाच वर्षात कुणी काय केलं याचा हिशोब जनतेला प्रचारादरम्यान द्यावा लागणार आहे. नंदुरबारची जनता आता जागृक आहे. या शहरात प्रत्येकाची पसंत वेगवेगळी असली तरी मातीशी इमान राखण्याची संस्कृती नागरिकांची आहे. यामुळे कोण कुणाचे हे ओळखणे जरा जिकरीचे जाणार आहे.
देशात सर्वत्र भाजपची सत्ता असली तरी नंदुरबार शहरातच काँग्रेसची सत्ता आहे. शिवाय जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवरही काँग्रेसची पकड कायम आहे. हे आव्हान आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्व कसे पेलते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. काँग्रेसला नेहमी शत्रू मानणार्या शिवसेनेने देखील काँग्रेसशी सेटिंग केल्याने भाजपची गणितं थोडी चुकली आहे. असे असले तरी डॉ. रवींद्र चौधरी यांच्या रूपाने भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. याचा फायदा भाजप आता कशा पद्धतीने घेते हे निवडणुकीच्या रिंगणात सुरू होणार्या राजकिय हलचलीवरून समजेल. नगरपालिका निवडणूकिला अजून दीड महिने बाकी आहेत पण राजकिय पटलावर घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. भाजपचा नुकताच मेळावा झाला. यामेळाव्यात डॉ. रवींद्र चौधरी यांनी कॉग्रेसवर टीकेची तोफ न डागता आम्ही काय करणार आहोत, याचे व्हिजन जनतेसमोर मांडले. त्याचप्रमाणे शहरविकास आघाडीचे नेते हिरालाल काका चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केकच्या माध्यमातून घराघरात पोहचण्याचा प्रयत्न केला.
व्हाट्सएपच्या म्हणजेच सोशल मीडियातुन डॉ. रवींद्र चौधरी चमकत आहे. एकंदरीतच भाजपाचा अप्रत्यक्षपणेे प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेसमध्ये अजून शांतता असली तरी ती वादळ पूर्वीची शांतता म्हणावी लागेल. आ. रघुवंशी यांनीही प्रचारासाठी जोशपूर्ण ऑडिओ गाणे तयार केले असून ते गाणे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून मोबाईलवर व्हायरल करण्यात आले आहे. एकंदरीतच निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशा राजकिय घडामोडी होऊ लागल्या आहेत.