काँग्रेस स्वबळावर लढणार

0

तालुकाध्यक्ष महेश धानके यांची बैठकीत माहिती

शहापूर । आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहापूर तालुका काँग्रेस पक्षाची महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादीशी युती न झाल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असे एकमताने ठरले आहे. अशी माहिती तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी दिली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील खरी चुरस आता वाढायला लागली आहे.

कार्यकर्त्यांनी सुचवले पर्याय काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुक्यातील काँग्रेसच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांपैकी काहींनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करावी असे सुचविलेे. तर काहींनी महागठबंधन करावे असे सुचविले. असे अनेक पर्याय कार्यकर्त्यांनी सुचविले.

बैठकीत एकमताने निर्णय
तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आपण राष्ट्रवादीकडे युती किंवा आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र युती किंवा आघाडी झाली नाही. तर काँग्रेस स्वबळावर जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या २८ अश्या सर्व जागांवर काँग्रेस आय निवडणूक लढविण्याचा एकमताने निर्णय बैठकीत यावेळी घेण्यात आला. तसे जाहीर करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. ह्या बैठकीस शहापूर तालुक्यातील सर्व विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.