इंदूर । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये 24 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ चांगल्याच फॉर्मात आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 26 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसर्या धावात 50 धावांनी कांगारूंवर सरशी मिळवून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या तिसर्या सामन्यातही विजयाची लय कायम राखत मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून भारतीय संघाची सातत्याने चांगली कामगिरी झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यत धडक मारल्यानंतर भारतीय संघाने विंडीजला त्यांच्याच घरात चारी मुंड्या चीत केले. त्यानंतर श्रीलंकेलाही तोच न्याय देताना 9-0 असा धुव्वा उडवत नवीन इतिहास रचला. एकीकडे विजयाच्या रुळावर भारतीय संघाची गाडी असताना, संघातील मधल्या फळीतील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येणार्या मनीष पांडे आणि केदार जाधव दोन्ही सामन्यांंमध्ये फ्लॉप ठरले आहेत. नाही म्हणायला केदार जाधवने पहिल्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 40 धावांचे योगदान दिले. पण दुसर्या सामन्यात तो खेळताना अडखळत असल्याचे पहायला मिळाले. अपयशी ठरलेल्या मनीषच्या जागेवर कोहली लोकेश राहुलला संधी देईल, असाच अंदाज आहे.
कोलकात्यातील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर आठ वर्षांनंतर भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग आठवा विजय मिळवला. याआधीही फक्त भारतानचे सलग आठहून अधिक नऊवेळा एकदिवसीय सामने जिंकले आहेत. 14 नोव्हेंबर 2008 पासून 5 फेब्रुवारी 2009 पर्यंत भारताने सलग नऊ सामने जिंकले होते. आता इंदूरमध्ये सामना जिंकून भारतीय संघ स्वत:च्याच विक्रमाशी बरोबरी करेल.
संघात बदल होण्याची शक्यता
विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वाईट काळातून वाटचाल करत आहे. कोलकात्यातील ऑस्ट्रेलियाचा पराभव हा त्यांचा सलग 12 वा पराभव होता. त्यामुळे इंदूरमध्ये विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. कांगारूंसाठी फिरकी गोलंदाजी मोठे डोकेदुखी ठरली आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने फोडून काढल्यावर झंपाला दुसर्या सामन्यातून वगळण्यात आले. झंपाच्या जागेवर अॅश्टन एगरची संघात वर्णी लागली. पण या बदलामुळे भारतीय फलंदाजांवर काहीच परिणाम झाली. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर ऑसी फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली याची स्पष्ट कबुली कर्णधार स्मिथने दिली.
तिसर्या सामन्यासाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियाचा संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, केदार जाधव, भुवनेश्वरकुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, लोकेश राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), हिल्टन कार्टराइट, पॅट कमिंस, एरॉन फिंच, ट्रॅविस हेड, केन रिचर्डसन, मॅथ्यू वेड, अॅडम झंपा, अॅश्टन एगर, नाथन कॉल्टर-नाईल, जेम्स फॉल्कनर, पीटर हँडस्कॉब, ग्लेन मॅक्सवेल. मार्कस स्टॉनीज, डेव्हिड वॉर्नर.