चेन्नई । श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर नेस्तनाबूत केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ 17 सप्टेंबरपासून सुरु होणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आपली विजयाची लय कायम राखण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. मागील काही वर्षांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने खूपच रोमांचकारी होत आहे. उभयसंघातील खेळाडूंचा जलवा मागील कसोटी मालिकेत पहायला मिळाला होता. ही कसोटी मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 0-5 असा विजय मिळवल्यास भारतीय संघ आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर जाईल. दुसरीकडे 4-1 अशा फरकाने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर कब्जा करेल. आघाडीचे दोन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवुड ऑस्ट्रेलियाच्या संघात नाहीत. पण स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ जास्त आक्रमक वाटत आहे. त्यांच्यासाठी भारत हे दुसरे घरच आहे. दोन्ही संघानी सामन्याच्याआधी कसून सराव केला आहे आता त्यांचे सर्व लक्श अंतिम अकरा खेळाडूंवर आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्शर पटेलला फुटबॉल खेळताना दुखापत झाली होती. मनगटाचा पुरेपूर उपयोग करणारे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल खतरनाक ठरू शकतात याची जाणिव ऑस्ट्रेलियन संघाला आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी त्यांनी मुरूगन अश्विन या स्थानिक फिरकी गोलंदाजाला पाचारण केले होते.
भारताला रोखू शकते ऑस्ट्रेलिया
श्रीलंकेत भारताने निर्भेळ यश मिळवताना दौर्यातील नऊ सामने जिंकले होते. भारताची ही विजयी घौडदौड रोखण्याची ताकद केवळ ऑस्ट्रेलियाकडेच आहे असे बोलले जाते. अर्थात त्यासाठी पुण्यात झालेल्या उभय देशांमधील कसोटी सामन्याचे उदाहरण देण्यात येते. स्टीव्ह स्मिथ पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतात एकदिवसीय सामना खेळणार आहे त्यामुळे त्याच्याकडेही सगळ्यांचे लक्श असेल. स्टिव्ह स्मिथने 44.26 च्या सरासरीने भारताविरुद्ध 3187 धावा केल्या आहेत. याशिवाय डेव्डिड वॉर्नरही भारताविरुद्ध त्यांच्या खेळपट्ट्यांवर पहिला सामना खेळेल. वॉर्नरला भारतीय खेळपट्ट्यांचा चांगलाच अनुभव आहे. आयपीएलमध्ये वॉर्नरने तुफानी खेळी केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातील वयाने सर्वात जेष्ठ असलेल्या खेळाडूकडून तशाच खेळाची मेजवानी मिळण्याची क्रिकेटप्रेमींना आशा आहे.
पावसाचे सावट!
सुमारे 30 वर्षांनंतर चेन्नईत होत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने 17 सप्टेंबर रोजी दुपारी आणि संध्याकाळी पावसाचे भाकित वर्तवले आहे. हवामान विभागच्या अंदाजानुसार चेन्नईमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल. यानंतर पावसाने विश्रांती घेतली तर ढगाळ वातावरण कायम असणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामना 1.30 वाजता सुरू होणार आहे. सामन्यासाठी राखीव दिवस नसल्यामुळे पाऊस जोरदार पडला तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यास सामन्याला उशिराने सुरुवात होईल आणि कमी षटकांचा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.
उभय संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, जसप्रित बुमराह, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्शर पटेल, लोकेश राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या.
ऑस्ट्रेलिया – स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), हिल्टन कार्टराइट, पॅट कमिंस, अॅरॉन फिंच, ट्रॅविस हेड, केन रिचर्डसन, मॅथ्यू वेड, अॅडम झंपा, अॅश्टन एगर, नाथन कॉल्टन नाईल, जेम्स फॉल्कनर, पीटर हँडस्कॉब, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टॉनीज, डेव्हिड वॉर्नर.