कांचीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती कालवश

0

चेन्नई (वृत्तसंस्था) – कांची कामकोटी मठाचे 69 वे जगद्गुरु शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे वयाच्या 82 व्यावर्षी निधन झाले. श्‍वासोच्छवासास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 रोजी झाला होता. त्यांचे मूळ नाव सुब्रमण्यम महादेव अय्यर असे होते. 1954 मध्ये कांचीपीठाचे माजी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी त्यांची वारसदार म्हणून निवड केली होती. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या निर्वाणानंतर आता विजयेंद्र सरस्वती हे शंकराचार्यांचे पुढील वारसदार असणार आहेत.

मंदीर व्यवस्थापकाच्या खुनाचा झाला होता आरोप
चार मठांपैकी कांची कामकोटी हा कांचीपुरम येथील हिंदूंचा प्राचीन मठ आहे. आद्यशंकराचार्यांनी या मठाची स्थापना पाचव्या शतकात केली होती. हिंदूधर्माचे अस्तित्व टिकविण्यासह कांची मठातर्फे शाळा, रुग्णालये, विविध सामाजिक संस्था चालविल्या जातात. दक्षिणेतील हिंदूपीठाचे हा मठप्रमुख केंद्र आहे. 22 मार्च 1954 रोजी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी जयेंद्र सरस्वती यांना आपले उत्तराधिकारी नेमले होते. त्यामुळे या प्राचीन मठाचे ते 69 वे शंकराचार्य ठरले होते. 2004 मध्ये त्यांच्यावर कांचीपुरम मंदिरातील एका व्यवस्थापकाच्या खुनाचाही आरोप झाला होता. परंतु, नऊ वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना या आरोपातून दोषमुक्त करण्यात आले होते. जयेंद्र सरस्वती यांना सकाळी 9 वाजता सिद्धी प्राप्त झाली, असे ट्वीट कांची मठाद्वारे करण्यात आले होते. तसेच, 82 वर्षे वय असलेले शंकराचार्य गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाशी झुंज देत होते, असेदेखील मठाने आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले होते. वयाच्या 19 व्या वर्षी शंकराचार्य झालेल्या जयेंद्र सरस्वती यांनी हिंदू अध्यात्माशिवाय दक्षिण भारतात अनेक सेवाउपक्रम राबविले. शाळा, रुग्णालये, बालचिकित्सा केंद्रे आणि मदत केंद्रेही त्यांनी उभारली होती. त्याचा सर्व जाती-धर्माच्या लोकांना लाभ मिळत आहे. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवर समाधीसंस्कार करण्यात आलेत.

थोडक्यात परिचय
– शंकराचार्य जयेंद्र सरस्वती
– हिंदूधर्मियांचे दक्षिणेतील धर्मप्रमुख
– 1954 मध्ये शंकराचार्यपदावर नियुक्ती, वेदांवर प्रभुत्व
– माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता यांचे अध्यात्मिक गुरु
– 2004 मध्ये मंदीर व्यवस्थापकाच्या हत्येप्रकरणी अटक
– दोन महिने कारावास, 2013 मध्ये आरोपातून निर्दोष मुक्त
– एका महिलेकडून आक्षेपार्ह वर्तन केल्याचाही आरोप
– विजयेंद्र सरस्वती आता नवे शंकराचार्य जाहीर

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटर संदेशात त्यांनी नमूद केले, की श्री कांची मठाचे आचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. ते आपल्या लाखो भक्तांच्या हृदयात उच्चविचारांद्वारे नेहमीच जीवंत राहतील. ईश्‍वर दिवंगत आत्म्याला शांती प्रदान करो.