कांताईंच्या स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

0

लावण्या देठे, वेदांत चौधरी, प्रणिता काबरा, वसुंधरा राठोड प्रथम

वाकोद – येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विदयालयात जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक राज्यभरातून सहभागी झाले होते. राज्यस्तरीय स्पर्धमध्ये पहिल्या गटातुन पंकज विद्यालय चोपडा येथील वेदांत पांडुरंग चौधरी व वाकोद विद्यालयातील लावण्या संतोष देठे तसेच दुसऱ्या गटामधुन प्रणिता श्रीकांत काबरा शेंदुर्णी व मोठ्या गटामधुन एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील वसुंधरा कैलास राठोड यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि भवरलालज जैन यांनी लिहिलेले पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आले.

सकाळ सत्रात स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन वाकोद येथील जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेनंतर दुपार सत्रात बक्षिस वितरण सभारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक यु.यु. पाटील होते. तर जैन उद्योग समूहाचे दिनेश दीक्षित हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर पांडुरंग पाटील, संपर्क अधिकारी ए.ए. पटेल, शेंदुर्णी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, मुख्याध्यापक व्ही.के. चौधरी, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. चौधरी, पर्यवेक्षक आर. एस. चौधरी, पाडुरंग पाटील, पोलीस पाटील संतोष देठे, माजी मुख्याध्यापक ए.टी. चौधरी, जैन फार्म व्यवस्थापक विनोदसिंह राजपुत, माजी मुख्याध्यापक एस.एस. पाटील, डब्लू.एस. पाटील उपास्थित होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली असुन प्रत्येक गटातील प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे ३००१ रूपये, २००१ रूपये, १००१ रूपये सोबत स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक गटातुन तीन क्रमांक काढण्यात आले.