जळगाव । जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त परिवारातील सदस्य व कंपनीच्या सहकार्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेत विक्रमी रक्तदानाचा पायंडा कायम ठेवला. कंपनीतील सर्व सहकार्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने स्नेह ठेवणार्या कांताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांच्या मनात निस्सिम आदर आहे. या कृतज्ञतेतून उत्स्फूर्तपणे या वर्षी 1,595 सहकार्यांनी रक्तदान केले. समाजातील गरजू व्यक्तिंना रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 6 सप्टेंबर रोजी कंपनीत भव्य रक्तदान शिबीर आयजिले जाते. अशाच पद्धतीचे रक्तदान शिबीर स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनी 9 मार्च ला देखील करण्यात येते. यात देखील सहकारी उत्स्फूर्त सहभागी होतात. सकाळी 07 ते सायंकाळी 08 पर्यंत चाललेले हे महा रक्तदान शिबीर कंपनीच्या प्रमुख 8 आस्थापनांमध्ये पार पडले. यात जैन प्लास्टिक पार्क येथे 1001, जैन हिल्स येथे 325, कांताई हॉल 23, चित्तूर 81, उदमलपेठ 28, बडोदा 57, अलवर 37 आणि हैदराबाद येथे 43 सहकार्यांनी रक्तदान केले.
जळगावमध्ये जैन हिल्स, जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, कांताई हॉल येथे व भारतातील चित्तुर, बडोदा, भावनगर, हैद्राबाद, उदमलपेठ, या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकार्यांनी रक्तदान केले. जैन हिल्स येथील बडीहांडा सभागृहात व प्लास्टिक पार्क येथे स्व. कांताबाई जैन यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. या भव्य रक्तदान शिबिरातील रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालय, रेडक्रॉस सोसायटी, स्व. माधवराव गोळवलकर रक्तपेढी, जळगाव ब्लड बँक आणि औरंगाबाद लायन्स क्लब आदी संस्थांनी रक्त संकलन केले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले. सहकार्यांची कंपनीप्रती असलेली आस्था व स्व. कांताईंच्याप्रती असलेली श्रद्धा याचे हे महारक्तदान शिबीर द्योतक आहे. सहकार्यांचे यासाठी असलेले योगदान कंपनीच्या सामाजिक बांधिलकी दृढ करणारे आहे अशा शब्दात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.