जळगाव – येथील ज्येष्ठ उद्योजक व व्यावसायिक कांतिलालजी हिरालालजी जैन (वय 74 वर्षे) यांचे मुंबई स्थित ग्लोबल हॉस्पीटलमध्ये 4 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा 5 एप्रिल रोजी आर्यम बंगलो, चर्च रोड, श्रद्धा कॉलनी जळगाव येथून सकाळी 8.00 वा निघेल. त्यांच्या पार्थिवावर जैन हिल्स येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.त्यांचे पश्चात पत्नी शकुंतला जैन, जेष्ठ सुपुत्र अभय जैन, अविनाश जैन, सुना, मुली अंजली, अरुणा, आरती, जावई, नातवंडे, पुतणे अशोकभाऊ, अनिल, अजित आणि अतुल, असा मोठा परिवार आहे. ते जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांचे लहान बंधू व सेवादास दलुभाऊ जैन यांचे पुतणे होते.
जैन ब्रदर्सच्या सुरूवातीपासूनच्या वाटचालीत त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. ते जैन उद्योग समूहाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. कांतिलाल जैन हे हसतमुख, कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी तसेच नितळ आणि अत्यंत दिलदार स्वभावाचे होते. यांचा जन्म वाकोद येथे 29 मार्च 1943 ला झाला. ते विज्ञानशाखेचे पदवीधर होते.
कांतिलालजींना फुफ्फुसात जंतू संसर्ग, लिव्हरचा आजार असल्यामुळे दहा दिवसांपूर्वी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. आकाश शुक्ल, डॉ. वैशाली सोलव, डॉ. कमलेश जैन, डॉ. गौरव सोबल, डॉ. क्षितीज चौधरी, डॉ. बोथरा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व त्यांची टिम यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, परंतु मिळणाऱ्या औषधोपचाराला शरीराने साथ न दिल्यामुळे त्यांचे 4 रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनसमयी परिवारातील सर्व सदस्य त्यांच्याजवळ उपस्थित होते.