कांदा अनुदानासाठी २ कोटी २७ लाखाचा प्रस्ताव

0

जिल्हयातील २७४३ शेतकरी अनुदानासाठी पात्र

जळगाव – यंदा कांद्याने भावात मोठ्या प्रमाणात निच्चांक गाठल्यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने मदत म्हणून प्रति क्वींटल २०० रूपये अनुदान देण्याचे ठरवीले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना अर्ज करण्याचे आवाहन देखील बाजारसमीती मार्फत करण्यात आले होते. जिल्हयात एकूण २७४३ शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यासाठी लागणार्‍या २ कोटी २७ लाख ५७ हजार ३५४ रूपयांच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी कांद्याला चांगले दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. मात्र आंतराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या कांद्याला कमी उठाव मिळाल्याने कांद्याच्या भावात कमालीची घसरण झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना कांदा अशरशा रस्त्यावर फेकून द्यावा लागला होता.

शासनाकडून मदतीची अपेक्षा
शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी कांदा उप्तादक शेतकर्‍यांनी लावून धरल्यानंतर शासनाकडून कांद्याला प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी बाजार समीत्यांनी शेतकर्‍यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. जिल्हयातील चाळीसगाव बाजारसमिती कडून ९४९ तर चोपडा बाजार समितीकडून २७३, यावल बाजारसमितीकडून १, जळगाव बाजारसमितीकडून १५२० असे एकूण २७४३ शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्यानंतर जिल्हा निबंधक कार्यालयाने एकूण २ कोटी २७ लाख५७ हजार ३५४ रूपयांच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाला पाठवीला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येणार आहे.