मुंबई । राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. राज्याबाहेर कांदा विक्रीला परवानगी दिल्यामुळे राज्यातील साठेबाजीला आळा बसून मणमानीपणे कांद्याचे भाव पाडण्याची व्यापार्यांची वृत्ती संपुष्टात येईल.
पंजाबात अभ्यासमंडळ पाठवा
याबाबत मंत्रालयात राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकार्यांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. कांदा इतर राज्यात निर्यात करण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी, कांदा उत्पादक शेतकर्यांचे अभ्यासमंडळ तयार करावे. या पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जाऊन त्याठिकाणी असलेली कांद्याची आवक-जावक, कांदा साठविण्यासाठी लागणारे गोदाम, बाजार भाव, लहान व्यापारी याबाबत माहिती घ्यावी, असेही खोत म्हणाले. प्रायोगिक तत्त्वावर कांदा निर्यात करण्यासाठी ट्रक भाड्याने घेण्यास आणि पंजाब बाजार समितीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून गोदाम घेण्यासाठी पणन मंडळाने तरतूद करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.