कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय

0

पणन संचालक तावरे यांची माहिती : बाजार समितीत करता येणार अर्ज

पुणे : राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी बाजार समितींमध्ये दि. 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

कांदा अनुदानासाठी शेतकर्‍यांनी 15 जानेवारीपर्यंत कांदा विक्री केलेल्या बाजार समितीमध्ये अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे पणन संचालक दीपक तावरे यांनी केले आहे. शेतकर्‍यांना सहाय्यासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावेत, शेतकर्‍यांना मोफत अर्ज उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही तावरे यांनी दिले आहेत.

शेतकर्‍यांना कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी येणारा प्रतिक्विंटल खर्च विचारात घेता, राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 200 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रसन्ना कृषी मार्केट, पाडळी आळे, जि. नगर या खासगी बाजार समितीतील कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांनाही अनुदान मिळणार आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबई वगळता सर्व बाजार समित्यासांठी योजना लागू करण्यात आली आहे.अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे. हे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाठवायचे आहेत.

कांदा उत्पादक शेतकर्‍याला प्रतिक्विंटल 200 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 200 क्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे. डीबीटीद्वारे थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. शेतकर्‍यांनी कांदा विक्री पट्टी, 7/12 उतारा, बँकेचे बचत खाते, आधार या कागदपत्रासह समितीकडे अर्ज सादर करावा.