मुंबई | नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीसंदर्भात लवकरच बाजारसमित्यांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येवून त्यांना सूचना देण्यात येतील, असे गृह (ग्रामीण)राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.सदस्य संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
श्री. केसरकर म्हणाले, शेतकरी फसवणुकीचे प्रकरण गंभीर आहे. भविष्यात असे फसवणुकीचे प्रकार घडवू नये म्हणून बैठकीत सूचना देण्यात येईल.
परराज्यातील व्यापाऱ्यांनी सटाणा येथील शेतकऱ्याची 24 लक्ष 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद होती.या फिर्यादीनुसार तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे.फरार आरोपीचा तपास सुरू आहे.आरोपींना बँकेत खाते उघडण्यासाठी मदत किंवा सहकार्य करणाऱ्यांचा शोध घेण्यात येईल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे श्री.केसरकर यांनी सांगितले.