स्थगन प्रस्तावाद्वारे अजित पवार यांची सरकारकडे मागणी
मुंबई :- राज्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठया अडचणीत असून यामध्ये सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. राज्यात कांदा उत्पादक आणि टॉमेटो उत्पादक शेतकरी मोठया अडचणीत सापडले आहेत. कांद्याला ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. टॉमेटोलाही भाव नाही. सरकारने याप्रकरणात लक्ष घालावे असेही पवार म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखावे. आयात-निर्यातीबाबत निर्णय घ्यावा लागला तर केंद्र सरकारची मदत घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
राज्यातील टोमॅटो उत्पादक हैराण
राज्यभरात बाजार कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादनातून फक्त खर्चच निघण्याची शक्यता आहे. हवामानातील सततच्या बदलाने पिकावर परिणाम झाल्याने या वर्षी टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोडणी केलेल्या टोमॅटोतून निवडून चांगलेच टोमॅटो बाजारात न्यावे लागतात. खराब फेकून द्यावे लागत आहेत. रोगापासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च अधिक करावा लागल्याने खर्च आणि विक्री समान होत असल्याने नफा मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.