पुणे । जलयुक्त शिवार आणि शेततळे योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे लागवडीखालील क्षेत्र पाच वर्षात दुप्पटीने वाढलेले आहे. म्हणजे एका वर्षात लागवाडीखालील क्षेत्र 1955 हेक्टरवरून 4215.90 हेक्टरवर पोहोचले आहे.2013पासून सामुहिक शेततळ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. 2017-18 या वर्षात आतापर्यंत 42 शेततळे बांधलेली आहेत. कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रमाअंतर्गत 2016पासून 2018पर्यंत एकूण 305 शेततळे बांधण्यात आली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 82 शेततळ्यांची उभारणी करण्यात आली. अशाप्रकारे बारामती तालुक्यात सन 2013 पासून 492 शेततळे देण्याचे काम तालुका कृषी विभागाने केले आहे. यामुळे कांदा उत्पादनाला शाश्वत पाणी मिळाल्याने कांदा उत्पादन क्षेत्रात लक्षणीय वाढ पाहण्यास मिळत आहे.
उत्पादनही वाढले
उत्पादन क्षेत्र वाढण्याबरोबरच उत्पादनातही वाढ झालेली आढळते. 2017-18 या वर्षात 22.5 मेट्रीक टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकार्यांनी दिली आहे. सन 2017-18 मध्ये 22 चाळी बांधण्यात आल्या असून त्यासाठी एका चाळीला 87 हजार 500 रुपयांचे अनुदान राज्य सरकार देत आहे. पूर्वी शेतकर्यांना चाळीची व्यवस्था नसल्यामुळे उत्पादन झालेला संपूर्ण कांदा व्यापार्यांना द्यावा लागत होता. पण चाळींच्या व्यवस्थेमुळे शेतकरी स्वतःच आपला कांदा विकण्याची आणि साठवून ठेवण्याची सोय झालेली आहे. यामुळे कांदा शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे.