खेड । कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या खेडच्या पश्चिम भागात कांदा लागवडीला वेग आला आहे. वाढत्या औद्योगिक भागामुळे स्थानिक शेतकरी कुटुंबातील अनेक मजूर कंपनीत कामाकरीता जाऊ लागले आहेत. त्यामुळेे बाहेर गावावरून मजूर आणून लागवड करावी लागत असल्याचे दिसून येते.
रब्बी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तीन ते चार महिन्या अवधीत कांदा पीक काढणीसाठी येते. याकरीता अगोदर पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर दीड ते दोन महिन्या अगोदर कांदा लागवडीसाठी कांदा बी टाकून रोपे तयार करावी लागतात. हिवाळ्यात कांद्याचे पीक जोमदार येते. मध्यम स्वरुपाच्या थंडीत पिक चांगले बहरून उत्पादन जास्त मिळते. कांद्यासाठी वाफे तयार करून त्यात पाणी साठवून लागवड केली जाते. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर पाणी द्यावे लागते. कांदा लावणीसाठी महिला मजूर लागतात मात्र, वाढत्या औद्योगिक भागामुळे मजूर महिला कंपनीत कामांसाठी जात आहेत. कारण कंपनीतील ठराविक वेळतेच काम असते. तसेच मोबदलाही जास्त मिळतो. चहा, नाश्ता हे मोफत दिले जाते. तसेच कामाचा व्यापही कमी असल्याने शेती कामांसाठी महिला मजूर मिळत नाहीत. यासाठी मावळ तालुक्यातून मजूर आणून कांदा लागवड करावी लागत आहे. दरम्यान, कांदा लागवडीसाठी विजेचा फटका बसून लागवड बंद ठेवावी लागल्याने मजुरीत वाढ होऊन तोटा होत आहे. किमान महवितरणने या कालावधीत तरी सहकार्य करावे, अशी विनंती शेतकरी करीत आहेत. सध्याचा कांदा बाजार पाहता उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची तक्रारी अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. गेली तीन वर्षे कांद्याचे भाव कोसळले आहेत. निदान येणार्या हंगामात तरी चांगला बाजारभाव मिळावा. मागील वर्षाप्रमाणे कांदा मातीमोल भावात जाणार नाही या आशेवर शेतकरी नव्या उमेदीने लागवड करीत आहे.