पुणे । नाशिक येथील कांदा व्यापार्यांवर आयकर विभागाने नुकतेच छापे टाकले. आता त्यांची नजर पुण्यातील कांदा व्यपार्यांवर आहे. कांद्याची कृत्रीम टंचाई निर्माण करू पाहणार्या व्यापार्यांवर आयकर विभागाकडून टाच आणली जात असून शहरातील व्यापारीही रडारावर असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नाशिकमधील छापेमारीमुळे पुण्यातील व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाला आहे. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कांदा व्यापार्यांवर गुरुवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. यामुळे तेथील कांद्याचे घाऊक बाजारातील दरही तब्बल 35 टक्क्यांनी घसरले आहेत. आयकर विभागाच्या 120 अधिकार्यांच्या पथकाने काही व्यापार्यांच्या कार्यालयावर, घरांवर तसेच गोदामांवर छापे टाकले असून त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. साठेमारी करून कांद्याचे दर वाढवणार्या व्यापार्यांवर कारवाई सुरू केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातही कांद्याने तिशी गाठली असून ते दर व्यापार्यांच्या साठेबाजीमुळे वाढल्याचे सांगितले जात आहे.