नाशिक : कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाणार्या नाशिक व लासलगाव येथे प्राप्तिकर विभागाने नऊ कांदा व्यापार्यांच्या दुकाने, गोदामे आणि घरांवर गुरुवारपासून जोरदार छापेसत्र राबविले. या छाप्यानंतर हादरलेल्या व्यापार्यांनी शेतकर्यांकडून खरेदी करावयाच्या कांद्याच्या दरात एकदम 35 टक्क्यांनी कपात केली. त्यामुळे कांद्याचे दर घसरले. परिणामी, संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीव्र आंदोलन केले. त्यामुळे लिलाव प्रक्रियाही बंद पडली होती. कालपर्यंत 1400 रुपये प्रतिक्विंटल असलेले कांद्याचे दर गुरुवारी तब्बल 900 रुपये प्रतिक्विंटलवर घसरले होते. दरम्यान, अनेक कांदा व्यापारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून, त्यांच्या व्यवहाराची तपासणी करण्यात येत होती.
केंद्राच्या इशार्यावरून कारवाई
दरम्यान, व्यापार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांद्याचे वधारलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशावरून प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे. जुलैत 400 ते 500 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा ऑगस्टमध्ये 2500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. कांद्याची साठेबाजी करणार्या व दर वाढविणार्या व्यापार्यांवर केंद्र सरकारने अशा प्रकारची कारवाई 2013 मध्ये केली होती. तशीच कारवाई आता करण्यात आलेली आहे. कांद्याचे दर अवघ्या महिनाभरात तब्बल पाचपटीने वाढविण्यामागे व्यापार्यांची साठेबाजी कारणीभूत असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनात आली होती. तर कराचीत कांदा 100 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, पाकिस्तानने भारतातून 50 हजार मेट्रिक टन कांदा मागविला आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात करण्यासाठीही व्यापारी कांदा साठवणूक करत असावेत, असा सरकारला संशय आहे.