शिरूर : कांद्याच्या हमीभावासाठी संघर्ष करणारा बळीराजा आता हतबल झाला असून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मोठा भांडवली खर्च करून शेतकरी कांद्याची लागवड करतात. चांगल्या बाजारभावाच्या प्रतिक्षेत साठवणूक करूनही नुकसानच सहन करावे लागत असल्याने तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एका शेतकर्याने कांद्याला बाजारात नेण्यापेक्षा शेतात खत म्हणून टाकणेच पसंत केले आहे.
सध्या कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने साठवणुकीतील कांदा सडून चालला आहे. त्यामुळे मोठा भांडवली खर्च करूनही हातात काहीच येत नाही. त्यामुळे कष्टकरी बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. कर्जाचा डोंगर उभा करुन शेतकरी राजा कांद्याची लागवड करत असतो. या कांदा पिकावर शेतकर्यांच्या मुलांची लग्न, शिक्षण, घर बांधणी असे वेगवेगळी कामे अवलंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला कमी बाजारभाव असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शहरी भागात कांद्याचे बाजारभाव वाढले की कांगावा केला जातो. अन् बाजारभाव कमी झाले की मोठ्या चवीने हाच कांदा खाल्ला जातो. त्यावेळी कष्टकरी बळीराज्याच्या डोळ्यात पाणी येते.