कांदा साठवणुकीवरील निर्बंध टाळण्यासाठी सदाभाऊचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

0

मुंबई । 2016-17 मध्ये 4 लाख 63 हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाली असून त्यातून आत्तपर्यंत 66 लाख 74 हजार मेट्रिक तन इतके उत्पादन झाले आहे. देशाच्या एकूण कांदा निर्यात क्षमतेपैकी 70 ते 80 टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो असे असताना कांदा साठवणुकीवर बंदी येऊ देणार नाही, अशी विनंती राज्याचे कृषी-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री मंत्री रामविलास पासवान आणि वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे.

कांदा आयातीवर निर्बंध घालण्याची विनंती
महाराष्ट्र कांद्याचे आगार आहे. देशात कांद्याच्या भावामध्ये वाढ होऊ लागली आहे. सुमारे 70 ते 80 टक्के कांदा शेतकर्‍यांनी कांदा चाळीमध्ये साठवणूक केलेला असल्याने दरवाढीचा फायदा कांदा उत्पादकांना होणार आहे. तरी केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध घालावेत आणि कांदा साठवणुकीवर निर्बंध घालू नये अशी विनंती खोत यांनी रामविलास पासवान यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. तसेच याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यात कांदा उत्पादन चांगले होत असताना कांदा आयात करण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणीही त्यांनी केली आहे.

राज्यात कांद्याच्या निर्यातीचा उच्चांक
यंदा देशातून एकूण 34 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाला असून त्यापैकी 80 टक्के वाटा राज्याचा आहे आणि हा आत्तापर्यंतच्या कांदा निर्यातीचा उच्चांक असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मागणीला दुजोरा देत लोकसभेचे संसद सदस्य संजयकाका पाटील यांनी देखील या मंत्र्यांना यासंदर्भात पत्रे लिहिली आहेत आणि याचा पाठपुरावा करत आहेत.