मुंबई – कांदिवलीत एका 54 वर्षांच्या व्यापार्याने आपल्या राहत्या निवासी इमारतीच्या सतराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मनिष कूपचंद मेहता असे या व्यापार्याचे नाव असून व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान मनिष मेहता यांच्या पत्नीसह मुलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. ही घटना काल सकाळी पावणेनऊ वाजता कांदिवलीतील लोखंडवाला टाऊन, ऑक्ट्राक्रेस्ट इमारतीमध्ये घडली.
या इमारतीच्या सतराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1704 मध्ये मनिष मेहता हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. त्यांचा कपड्याचा आयात-निर्यातीचा व्यवसाय होता. मात्र काही वर्षांत त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. बरेच प्रयत्न करुनही व्यवसायातील नुकसान भरुन काढणे कठीण जात होते. याबाबत त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशीही चर्चा केली होती. काही दिवसांपासून मनिष हे मानसिक तणावात होते. काल सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. सकाळी साडेआठ वाजता ते घरी आले. यावेळी मुले कॉलेजमध्ये गेले होते तर पत्नी किचनमध्ये कामात व्यस्त होती. यावेळी त्यांनी बेडरुममधून उडी मारली होती. सतराव्या मजल्यावरुन पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी समतानगर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या समतानगर पोलिसांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन पत्नी आणि मुलांची जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीतून मनिष यांना व्यवसायात आलेले नुकसान आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.