शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाटले मोफत कांदे; योग्य दर मिळत नसल्याने संताप

0

हमिभाव मिळावा म्हणून मोफत कांदे वाटप

जळगाव – जिल्ह्यात कांदे पिकाला हमिभाव मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टर भरून आणलेल्या कांद्याचे मोफत वाटप करुन शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केले. यावेळी कांदे उत्पादकांनी कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले.

काय म्हटले आहे निवेदनात
कांदे उत्पादकांनी पिकविलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्च देखील मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या उदासिन धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले अनुदान देखील अतिशय कमी आहे. शासनाच्या धोरणाचा व कांद्याला मिळणाऱ्या कमी भावाचा सर्व शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या स्थळी मोफत कांद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी रवी देशमुख, बापू माळी, उखा माळी, सुपडू माळी, बापू मराठे, सुभाष माळी, गोपाळ माळी, वसंत वाघ, पंकज वाणी, अमित वाणी, प्रशांत वाणी, रविंद्र वाणी आदी शेतकरी उपस्थित होते.

या केल्यात मागण्या
शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत मिळावी, कांद्याला अनुदान रक्कम वाढवून मिळावी, कृउबासह व्यापाऱ्यांना कांदा विक्री करण्याऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा अनुदानाचा लाभा द्यावा, नदीजोड प्रकल्प तोबडतोब राबवावा. कडधान्य, फळपिके आणि कापूस यांना योग्य भाव द्यावा, कांदा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव घोषित करावा.

कांदे घेण्यासाठी नागरीकांची झुंबळ
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला हमी भाव मिळत नसल्याने एक ट्रॅक्टर मोफत कांदे वाटप करण्यात आले. यावेळी रस्त्यावरून जाणारे नागरीकांना आपली दुचाकी बाजूला लावून कांदे घेण्यासाठी एकच धावपळ सुरू केली. यावेळी नागरीकांनी मिळेल त्या पिशवीमध्ये कांदे घेण्यासाठी झुंबळ उडाली होती. एकीकडे संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते तर दुसरीकडे नागरीकांची मोफत कांदे घेण्यासाठी दुचाकीची डिक्कीत कांदे भरण्यास मग्न होते.