कांद्याचा बाजारभाव कोसळल्याने उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात तरळले पाणी

0

तळेगाव दाभाडे। सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे. मावळ तालुक्यातील वडगाव, माळवाडी, कोटेश्‍वर वाडी, इंदोरी, जांबवडे, सुदुंबरे, खालुंब्रे आदी भागांमध्ये सध्या रब्बी हंगामातील कांदा काढणी अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी कांद्याच्या कमी बाजारभावामुळे शेतकर्‍यांवर कोसळलेल्या कुर्‍हाडीची जखम ताजी असताना चालू वर्षीसुध्दा हा बाजारभाव शेतकर्‍यांचे पानिपत करत आहे. चालू वर्षीही भाव नाही. साठवायचा तर, गतवर्षी सडलेल्या, उकिरड्यावर फेकलेल्या कांद्याचा वास अद्यापही गेलेला नाही. गतवर्षी कांद्याने शेतकर्‍यांची मोठी दैना केली. उत्पादन भरपूर निघाले पण बाजार डाऊन. सोन्यासारखा माल कवडीमोल भावाने विकताना शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

साठवणीमुळे दुहेरी नुकसान
गतवेळी कांद्याचा भाव प्रतिकिलो 6 ते 8 रुपये होता. साठवण करताना कांदाचाळ वा वखार बांधणी, बारदाणा, वाहतूक, मजुरी हा अतिरिक्त खर्च शेतकर्‍यांना नाहक करावा लागला. हे सर्व करून जूलै महिना उजाडला तरी भाव नाही, उलट तो थेट रुपया ते दीड रुपया प्रतिकिलो ग्रॅम एवढ्या लाजिरवाण्या पातळीवर गेला. पावासाचे दिवस सुरू झाल्याने हा कांदा सडून गेल्याने नाईलाजाने शेतकर्‍यांनी नाकाला फडके लावून हा कांदा अक्षरशः उकिरड्यावर टाकला. त्यात शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान झाले. गेली दोन वर्षे शेतकरीवर्ग नगदी पीक कांदा तसेच टॉमेटो व भाजीपाला वर्गातील पिकांचे उत्पादन करण्यासाठी बँका तसेच सोसायटीतून कर्जे उचलून त्यासाठी खर्च करीत आहे. तयार झालेला माल कवडीमोल भावाने बाजारात विकला गेल्यामुळे या पिकांचा भांडवली खर्चदेखील वसूल झालेला नाही.

सर्व बाजारपेठांमध्ये सारखीच स्थिती
बहुतांश शेतकरी या बाजारभावात कांदा विकूनही साधी मजुरीही भागत नाही म्हणून कांदा साठवणे पसंत करतात. मात्र शेतकर्‍यांना गतवर्षीचा कटू अनुभव असल्याने यावर्षी कांदा ठेवण्याचा कोणताच शेतकरी विचार करत नाही. पुणे, नगर या ठिकाणी बाजारभाव नाहीत. दोन पैसे जरा बर्‍यापैकी मिळतील या आशेने येथील शेतकरी सोलापूर, कोल्हापूर, अशा लांबच्या बाजारपेठा गाठत आहे. मात्र, सब घोडे बारा टक्के असाच अनुभव त्याला सर्वत्र येत आहे. उलट वाहतूक खर्च वाढतो व अधिक तोटा होतो. मात्र हा तोटा सहन करून शेतकरी कांदा मात्र घरी न ठेवता विक्रीसाठीच पाठवत आहे.

फक्त हमी भाव पाहिजे
शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकर्‍यांची सध्या आई भीक मागू देत नाही, बाप पोट भरून देत नाही अशी अवस्था झाली आहे. शेती सोडून दुसरे काही करू शकत नाही. शेती केली तर मायबाप सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतात उत्पादित झालेल्या शेतमालाचा भांडवली खर्च देखील वसूल होत नाही. मग शेतकरीवर्गाने जगायचे तरी कसे, हा गहन प्रश्‍न शेतकरीवर्गाला पडला आहे. भाजीपाला खाणार्‍याला स्वस्त देण्याच्या धोरणामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे आर्थिक भरडला गेला आहे. शेतकरीवर्गाला कर्जमाफी नको कर्जमुक्ती नको, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पिकवलेल्या शेतमालाला भांडवली खर्चाच्या तुलनेत हमी भाव पाहिजे, अशी तीव्र भावना शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

कोणीच वाली नाही
शासनाने आर्थिक बजेटमध्ये कृषी सिंचनावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करून शेतकर्‍यांचा कैवारी असल्याचे दाखवले असले, तरी सध्या शेतीत तयार होणार माल जर कवडीमोल भावाने विकला जात असले तर सध्या उत्पादन होणारा शेतमाल व सिंचनाचे क्षेत्र वाढल्यावर अधिकचा उत्पादित शेतमाल असे भरमसाट उत्पादन झाल्यावर भविष्यात शेतकर्‍यांचे काय होईल, याची चिंता सर्वसामान्य शेतकरीवर्गाला पडली आहे.