पुणे । कांद्याचे दर कडाडले असून किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये तर घाऊक बाजारपेठेत प्रति किलो 20 ते 25 रुपयेे दराने विक्री होत आहे. दक्षिण, उत्तर भारतातून वाढलेली मागणी, त्यातच बाजारात निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे कांद्याचे भाव कडाडले आहेत. मार्केट यार्डातील कांदा विभागात 15 दिवसात कांद्याच्या भावात तिपटीने वाढ झाली आहे. तब्बल तीन वर्षानंतर कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली आहे.
घाऊक बाजारात 25 रुपये किलो
बाजारात मागील महिन्यात कवडीमोल भावाने कांद्याची विक्री होत होती. त्यामध्ये थोडी-थोडी वाढ होण्यास सुरुवात झाली. 16 जुलै रोजी येथील घाऊक बाजारात कांद्याला प्रती किलो 8 रुपये भाव मिळत होता. त्यामध्ये पंधरा दिवसात तिपटीने वाढ झाली आहे. आता घाऊक बाजारात कांद्याला 20 ते 25 रुपये भाव मिळत आहे.
कांद्याचा तुटवडा
गुरूवारी येथील बाजारात 60 ट्रक कांद्याची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत ही कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे येथील बाजारातही कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. सध्या बाजारात साठवणूक केलेला कांदा येत आहे. नवीन हंगाम दिवाळीला सुरू होईल. तोपर्यंत बाजारात कांद्याचा तुटवडाच राहणार आहे.
कांदा थेट दक्षिण भारतात
उत्तर, दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामधून कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव, नाशिक बाजार समितीतून कांदा थेट उत्तर आणि दक्षिण भारतात जात आहे. परिणामी येथील बाजारात होणारी कांद्याची आवक घटली आहे, असे पोमण यांनी सांगितले.
उत्पादन घटले
कर्नाटकातून देशात मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होत होती. मात्र, मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाचा परिणाम कर्नाटकातील कांदा उत्पादनावर झाला आहे. नेहमीच्या तुलनेत केवळ 20 टक्केच उत्पादन झाले आहे. त्यामुळे कर्नाटक येथून होणारी निर्यात घटली आहे. त्यातच गुजरात आणि मध्य प्रदेश येथूनही अपेक्षित कांद्याचे उत्पादन झालेले नाही. त्यामुळे मागणी वाढली आहे.
रितेश पोमण, कांदा व्यापारी