पुणे । परतीच्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली असून प्रतिकिलोस पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. पंधरावड्यात घाऊक बाजारातील कांद्याचे दर 37 रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर किरकोळ बाजारात 40 ते 45 रुपये कांद्याचे दर होते. त्यानंतर अचानक बाजारातील आवक वाढल्याने, घाऊक आणि किरकोळ दरात घट झाली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे.
जुन्या कांद्याला 300 रुपयांचा दर
शनिवारी बाजारात जुना आणि नवा मिळून जवळपास 100 ट्रक कांद्याची आवक झाली. प्रति दहा किलोला घाऊक बाजारात जुन्या कांद्यास 300 ते 400 रुपये आणि नवीन कांद्यास 170 ते 300 रुपये दर मिळाला. दरम्यान जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मंचर, संगमनेर, श्रीगोंदा येथून जुन्या कांद्याची आवक होत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून काही प्रमाणात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे.
नवीन कांदा हलक्या प्रतीचा असल्याने, मागणी कमी आहे. दर आठवड्याच्या तुलेनत रविवारी आवक कमी झाली. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. जुन्या कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने आवक आणि मागणीचा अंदाज घेत शेतकरी कांदा विक्रीस आणत आहेत. कांद्याची आवक घटल्याने राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन हळवी कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली असली तरी अपेक्षित आवक होत नाही.
नवीन कांदा हलक्या दर्जाचा
सध्या बाजारात येत असलेला नवीन कांदा हलक्या प्रतिचा असून तो परराज्यात पाठविण्या योग्य नाही. तसेच जुन्या कांद्याची आवक कमी होत असल्याने दरवाढ होत आहे. नवीन हळवी कांदा मागणीच्या प्रमाणात बाजारात यायला अवधी आहे. त्यामुळे जुन्या कांद्यास महिनाभर चांगली मागणी राहिल. त्यानंतर मात्र दर कमी होतील अथवा स्थिर राहतील.
– रितेश पोमण, कांदा व्यापारी