निफाड : उन्हाळ कांद्याला शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत क्विंटलला 3800 रुपये दर मिळाला. दोन वर्षांतील हा उच्चांकी दर ठरला. सद्या उन्हाळ कांद्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. लासलगाव बाजार आवारात उन्हाळ कांद्याला किमान 1800, कमाल 3800 तर सरासरी 3200 रुपयांचा भाव मिळाला.
दोन वर्षांनंतर कांद्याने साडेतीन हजार रुपयांचा टप्पा पार केला. ऑगस्ट महिन्यापर्यंत दोनशे ते पाचशे रुपये दराने प्रतिक्विंटल कांदा विकल्याने शेतकर्यांना तोटा सहन करावा लागला होता. कांद्याला भविष्यात भाव मिळतील या अपेक्षेने फार कमी शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवला होता. त्या कांद्याला आज चांगले दर मिळत आहेत. परतीच्या पावसामुळे नवीन लाल कांद्याचा दर्जा हा ओलसर काळपट असून, यामुळे बाजारात उठाव नाही. जुन्या उन्हाळ कांद्याला जास्त मागणी असल्याने दर वाढले आहेत. नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात आवक होण्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.