पिंपळनेर। आठ दिवसांपासून सुरू असलेला शेतकर्यांचा संप मिटल्याने येथील बाजार उपसमितीत कांदा लिलाव व खरेदी विक्री व्यवहार सुरू झाले. सोमवारी पहिल्या दिवशी 125 पेक्षा अधिक वाहने उपसमितीत कांदा घेऊन आल्याने 250 ते 640 पर्यंत प्रतिक्किटल भाव फुटला. लिलाव पध्दतीने कांद्याला भाव मिळाल्याने शेतकर्यांना ऐन पेरणीत बियाणे खरेदीसाठी पैसा उपलब्ध होत आहे. यामुळे कांदा विक्रीसाठी वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे संजय बसावा यांनी सांगितले.
शेतकर्यांना दिलासा
शेतकरी संपादरम्यान बाजारात भाजीपाला, धान्य व अन्य शेती उत्पादनें विक्रीसाठी येत नसल्याने शेतकरीही काही अंशी आर्थिक संकटात सापडला होता. खरीप पेरणीसाठी लागणारे बियाण,े मुलांचा शालेय खर्च व अन्य व्यवहाराला अडचण निर्माण झाली होती. सोमवारी येथील बाजार उपसमितीत कांदा लिलाव सुरू झाला. या प्रक्रियेत प्रभाकर कोठावदे, प्रा.किरण कोठावदे, नासिर सैय्यद, सोमनाथ कोठावदे, महेश भदाणे, संचालक गजेंद्र कोतकर, जितू कोतकर, दीपक भदाणे, दीपक पाटील नहिरे यांच्यासह अनेक व्यापारी सहभागी होते.