काकडे, गायकवाड यांच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये खळबळ

0

पुणे : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी अनपेक्षित नावे आल्याने काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणालाच कलाटणी मिळाली आहे.

पुण्यात उमेदवारीसाठी नवे प्रयोग नकोत असे पत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना कळविल्या आहेत आणि स्वतः निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे.

गेल्या दोन महिन्यात पुण्यातील काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी खूप घडामोडी झाल्या. त्या पार्श्वभूमीचा आता आढावा घेतला पाहिजे म्हणजे काँग्रेसमधील अंतःप्रवाह काय आहेत ते लक्षात येईल. आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड आणि नगरसेवक अरविंद शिंदे असे पाचजण लोकसभेसाठी इच्छुक होते. काँग्रेसच्या शहर समितीने या पाच नावांची शिफारस प्रदेश समितीकडे केली त्यात छाननी करून प्रदेश समितीने जोशी, छाजेड आणि शिदे ही नावे केंद्रीय समितीकडे पाठविली. प्रदेश समितीकडून जी नावे येतील त्यावर गांभीर्याने विचार होईल अशी भूमिका प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. त्यामुळे हे तिघे इच्छुक जोरदार तयारीला लागले.

पुणे हा मतदारसंघ असा आहे की, येथे उमेदवारीबाबत एकमत झाले नाही त्यामुळे चर्चा होत राहिल्या, पक्षाचे नेतेही नवनवीन नांवे शोधत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करू लागला. यातून खासदार संजय काकडे यांचे नाव पुढे आले. पक्षाच्या अंतर्गत या घडामोडी होत असतानाच राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन बाहेरचा उमेदवार नको असा ठराव काँग्रेस समितीत केला आणि काकडे यांच्या पुढे अडथळे उभे केले.

मात्र, काँग्रेस पक्षातील एक गट आणि राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते यांची पसंती काकडेंच्या बाजुने राहिली. त्यामुळे काकडे यांचे नाव चर्चेत राहिले. या पाठिंब्याच्या आधारे काकडे यांनी गाठीभेटींना सुरुवात केली. राष्ट्रवादीतून काकडे यांना भक्कम पाठिंबा मिळत गेल्याने काँग्रेस नेतेही गडबडले. त्यांनी आपल्या पक्षाचेच जोशी, छाजेड आणि शिंदे ही नावे चर्चेत राहतील असे बघितले. दरम्यान आता प्रविण गायकवाड यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे.

या नावाची भर पडल्यावर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. पण, गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा थांबली नाही. छत्तीसगड आणि दिल्लीत दोन वेळा गायकवाड यांची राहुल गांधींसमवेत भेट झाली ही माहिती खुद्द गायकवाड यांनीच पत्रकारांना दिली. संभाजी ब्रिगेडचे नेते आणि सध्या शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी अशी गायकवाड यांची ओळख आहे. त्यांच्या उमेदवारीला शरद पवारांची अनुकूलता आहे असे बोलले जाते.

समाजकारणात प्रदीर्घ काम करणारे जिग्नेश मेवाणी यांना उमेदवारी देण्याचा प्रयोग गुजरातमध्ये यशस्वी झाला त्याच धर्तीवर गायकवाड यांना उमेदवारी दिली जाईल अशी मांडणी केली जात आहे. मात्र, उल्हास पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसअंतर्गत चाललेल्या घडामोडींवर भाष्य केल्याने कार्यकर्ते हलले आहेत. २०१४ मध्ये उमेदवारीचा एक प्रयोग पुण्यात करण्यात आला होता. मोदी लाटेत तो प्रयोग उधळला गेला.