काकडे भाजप सोडण्याच्या मार्गावर?

0

पुणे । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी पुरे शहराच्या दौर्‍यावर होते. शिवाय पुणे मुक्कामी असणार्‍या संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालख्यांचेही शहा यांनी दर्शन घेतले. या सर्व कार्यक्रमादरम्यान भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. परंतु भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे मात्र कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे ते भाजप सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर रंगली होती.

काकडे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभेची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या आणि विविध पक्ष पदाधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याही भेटी घेतल्या होत्या. खासदार अनिल शिरोळे यांनी आगामी लोकसभेसाठी मीसुद्धा उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजपत अंतर्गत कलह रंगणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्यात शहा शहरात असताना कुठल्याच व्यासपीठावर काकडेंची उपस्थिती नसल्याचे पाहून ते भाजप सोडण्याच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी चर्चा दीर्घकाळ रंगली होती.