पुणे । अपक्ष खासदार संजय काकडे यांचा गट यापुढे कोणती खेळी खेळतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. या गटास कोणते नेते तातडीने संपर्क ठेवतील याचीही उत्सुकता आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्तावापसी या शीर्षकाखाली जनशक्तीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडविली. पालिकेतील प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहिले तर काकडे गटाने बंड केल्यास भाजपची सत्ता उलथून पडेल याबाबत आज वेगवेगळी अनुमाने मांडली जात होती. भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या काकडे आणि त्यांच्या समर्थकांना चुचकारण्याचे प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून केले जातील, असेही बोलले जात होते.
समान पाणी पुरवठा निविदा प्रकरणात काकडे यांची सरशी झाली, पण राजकीय पातळीवर भाजपने त्यांच्या समर्थकांना सामावून घेतलेले नाही. त्यामुळे या समर्थकांची राजकीय सोय कशी लावणार? याकरिता पक्षातील एखाद्या निष्ठावंताचा बळी जाणार का? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. काँग्रेस पक्ष अगदी अल्पमतात आहे. त्यामुळे राजकीय हालचालींचे केंद्र राष्ट्रवादी काँग्रेस राहील हेही स्पष्ट आहे. भाजपमधील काकडे यांचा मोठा गट ही भाजपसाठी डोकेदुखी राहण्याची चिन्हे आहेत.