काकडे-शहा भेटीने भाजपमध्ये तर्कवितर्क

0

पुणे । शहराच्या राजकारणात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कुरघोड्या करू पाहणारे खासदार संजय काकडे यांनी भाजपचे शहराध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याने भाजपमध्ये तर्कवितर्क लढविणे सुरू झाले आहे. शहा यांनी काकडे यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या की ‘सबुरीने रहा’ असा सल्ला दिला याची चर्चा पक्षात आहे.

ही सदिच्छा भेट होती, असे काकडे यांच्या गोटातून सांगण्यात आले. मात्र अर्धा तास झालेल्या भेटीत राजकीय सध्यस्थितीवर चर्चा झाली, असेही सांगण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत मिळू लागले आहेत.त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणी झाले असे मानले जाते.लोकसभेसाठी पालकमंत्री बापट इच्छुक आहेत. त्यादृष्टीने जमवाजमव बापट यांनी सुरु केली आहे. त्याचवेळी काकडे यांनी आपले वजन विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या पारड्यात टाकले आहे. याखेरीज लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीही नावे घेतली जातात.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बापट आणि काकडे यांच्यात दिलजमाईचा प्रयत्न केला.पण फार काळ ती टिकली नाही.महापालिकेच्या कारभाराबद्दल किंवा समान पाणीपुरवठा योजनेतील वाढीव निविदा याविषयी काकडे यांनी उघड नाराजी व्यक्त केली.त्याना उत्तर देण्यासाठी बापट यांनीहि पालिकेत नगरसेवकांची बैठक घेतली होती.