काकडे समर्थक नगरसेवक स्वस्थ बसतील का ?

0
पुणे : लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी भारतीय जनता पक्षातील धुसफूस डोके वर काढ लागली आहे. खासदार संजय काकडे यांच्या विरोधात सर्व भाजपच उभा राहिला आहे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. अशा स्थितीत काकडे समर्थक नगरसेवक स्वस्थ बसतील का ? याकडे लक्ष आहे.
पुणे महापालिकेत भाजपचे ९८ नगरसेवक आहेत, आणि त्यात संघ परिवाराची पार्श्वभूमी नसलेले ४० नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्षातून २०१७च्या निवडणुकीत पक्षांतर केलेले यात अधिक आहेत. खासदार काकडे यांच्या मध्यस्थीने बहुतेक पक्षांतर झाले आहे. या पक्षांतर मोहीमेला भाजपचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता. पक्षांतर मोहिमेने भाजपला महापालिकेत प्रथमच बहुमत मिळालं आणि भाजपचा महापौर झाला .
अलिकडे मात्र भाजप पासून काकडे दुरावत चालले असून काँग्रेसशी जवळीक त्यांची वाढती आहे असे साधारण चित्र आहे. पण भाजपने काकडे हा विषय पक्षापुरता संपविण्याचे ठरविले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवसेनेशिवाय लढले तर दोन लाख मतांनी पडतील असे वक्तव्य काकडे यांनी केले. त्याला उतर देताना भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ९८ नगरसेवकांच्या वतीने काकडे यांचा निषेध करीत असल्याचे म्हटले आहे. येथेच खरी मेख आहे. या ९८ नगरसेवकांमध्ये काकडे समर्थक काहीतरी असतील की नाही ?नगरसेवकांमध्ये काकडे झिरो झाले आहेत असे दाखवायचा भाजपचा प्रयत्न दिसतो. पण वस्तुस्थिती तशी आहे का ? भाजपने काकडेंना दूर लोटण्यास सुरुवात केली तरी त्याची प्रतिक्रिया महापालिका भाजपमध्ये निश्चित उमटेल. काकडे आणि भाजप संघर्ष त्यावेळी कलाटणी घेईल . याकरिता फार वाट पहावी लागणार नाही.