नंदुरबार । तालुक्यातील काकरदे गावात सट्टा बेटिंगबरोबरच रसायन मिश्रीत ताडी,गावठी दारू या सारखे बेकायदेशीर धंदे सुरू असल्याने गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तालुका पोलिसंकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या असून याकडे पोलिस अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. नंदुरबार तालुक्यातील हाटमोहीदे, जुनमोहिदे, नसिंडे, शिंदगव्हान या गावांत अवैध धंद्यांबरोबरच दारूबंदी करण्यात आली आहे. याचा फायदा घेत काकरदे गावात सट्टाच्या पेढ्या गावठी दारू,ताडी यासारखे धंदे खुलेआम सुरू झाले आहेत. यामुळे गावातील अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. परिसरातील गावांमध्ये हे धंदे बंद झाले असले तरी काकरदे गावात याची रोज जणूकाही यात्राच भरत आहे. सट्टा पेढ्यांमुळे तर रोज ५० हजाराहून अधिक उलाढाल होत असल्याचे समजते.
पोलीसठाण्यावर मोर्चांचा इशारा
दिवसाला मजुरी करणारा ५० रुपयांचा सट्टा खेळत असल्याने घरात भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. याबाबत पोलिस पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पण मंथलीच्या प्रकारामुळे त्यांच्या तक्रारीकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होतो आहे. काकरदे हे गाव कोपर्ली औट पोलिस अंतर्गत येते, मात्र तेथील पोलिस यंत्रणादेखील हे धंदे बंद करण्यासाठी सपशेल अपयशी ठरली आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावत असून गावातील शांततेला बाधा पोहचत आहे. अशा अवैध धंद्यांमुळेच नवापूर तालुक्यातील लक्कड कोट या ठिकाणी पोलिसांना मार खावा लागला आहे. ही घटना ताजी असतांनाच नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये सट्टा जुगार,गावठी दारू,रसायन मिश्रीत विषारी ताडी आदी प्रकारच्या बेकायदेशीर धंदा सुरू ठेवणार्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावातील हे बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास पोलिस ठाण्यांवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.