नंदुरबार। शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील श्री. खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव 30 एप्रिल रविवार रोजी भरणार आहे. बारा गाड्यांची लांगड एकट्या भगताने ओढणे हे यात्रेचे वैशिष्ट्य असते. नंदुरबारपासून जवळच असलेल्या काकर्दे गावात खंडेराव महाराजांचे भव्य मंदीर आहे. या ठिकाणी दरवर्षी शंकराचार्य जयंतीला यात्रोत्सव भरविण्यात येतो. दरवषीप्रमाणे यावर्षी देखील 30 एप्रिल रोजी खंडेराव महाराजांची यात्रा भरणार आहे. सकाळीपासूनच अनेक भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात नवसाला पावणारा खंडेराव महाराज असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे यात्रेच्या दिवशी खोबरे आणि भंडारा उधळून भाविक नवस फेडत असतात.
एकामागून एक अशी बारा गाड्यांची रांग
दुपारी भावातून तगतरावांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत असते. त्यानंतर सायंकाळी खर्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते. वाघ्या मुरलींना सजवून गावात मिरवणूक काढल्यानंतर मंदिर परिसरात बारा गाड्यांची लांगड ओढण्याचा कार्यक्रम सुरु होतो. एकामागून एक अशी बारा गाड्यांची रांग बांधली जाते. सायंकाळी सुर्यास्त होण्याच्या आधी ती बारा गाड्यांची लांगड बन्सीलाल महाजन (भगत) हे ओढतात हा चमत्कारीत आणि श्रद्धेचा नजारा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने काकर्दे गावात दाखल होतात गावाचे युवा सरपंच प्रकाश माळी, पोलिस पाटील अनंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सारे ग्रामस्थ एकजुटी यात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात मेहनत घेत असतात. रात्रीच्या करमणूक तमाशा फडाचे देखील आयोजन करण्यात येत असते.