काकाच्या खून प्रकरणी पुतण्याला अटक

धुळे : अनैतिक संबंधाच्या संशयातून पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील अंबोडे येथे घडली होती. पोलिसांनी 24 तासात गुन्हा उघडकीस आणला. रणाईचे तांडा येथून मयताच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्‍वर रामभाऊ राठोड (25, रा.रणाईचे तांडा, ता.अमळनेर) असे मयताचे नाव असून मयताचा पुतण्या जगदीश बबलु राठोड (रा.रणाईचे तांडा) याला अटक करण्यात आली. धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रपरीषदेत ही माहिती दिली.

जळालेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
गुरुवार, 2 जुन रोजी अंबोडे शिवारात एका अनोळखी पुरुष इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावरून मयताची ओळख पटविण्यात आली. मयताच्या पोटावर, पाठीवर, तोंडावर तिक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आले मात्र तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती काढून मयताचा पुतण्या जगदीश बबलु राठोड (रा.रणाईचे तांडा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाचे कारणावरून त्याने मयतास रणाईचे तांडा येथून मोटार सायकलवर घेवून अंबोडे शिवारात निर्जनस्थळी आणत त्यांच्यावर चाकूने वार करत त्याचा खून केला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल महाजन, सागर काळे, सुनील विंचुरकर, प्रवीण पाटील, सोमनाथ कांबळे, योगेश पाटील, प्रमोद पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, योगेश पाटील, विशाल गुरव यांनी केली.