गंगापूर-मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या युवकाने काल आत्महत्या केली. काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणाने मराठ समाजात संताप व्यक्त होत असतानाच अखेर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. गंगापूरमधील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
कायगाव टोका येथे गंगापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या नेत्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. दुपारी तीनच्या दरम्यान कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला.
२२ जुलै रोजी प्रशासनाला या आंदोलनासंदर्भातील निवेदन देण्यात आले होते. यानंतरही आंदोलकांना रोखण्यासाठी उपाययोजना का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.