कागल । येथील नगरपरिषदेच्या इमारतीला शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत इमारतीतील पहिला मजला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तसंच, आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जळाली आहेत. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली.
या आगीत पहिल्या मजल्यावरील बांधकाम,आरोग्य, भांडार आणि पाणीपुरवठा विभागाची कागदपत्रे जळून खाक झाली. पहाटेची वेळ असल्यानं आग लागल्याचं फार उशिरा लक्षात आलं. यामुळे पहिल्या मजल्यावरील कार्यालयं जळून खाक झाली. ही आग अत्यंत भीषण असल्यानं तिची झळ दुसर्या मजल्यापर्यंत पोहोचली. शॉर्टसर्किटमुळं ही दुर्घटना घडल्याचं समजतं. आगीची घटना कळताच अग्निशमनदलानेआग नियंत्रणात आणली.