मुंबई। मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सातव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम फेरी अतिशय चुरशीची झाली. प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालकेच्या विकास धारियाने अंतिम लढतीत प्रतिस्पर्धी राष्ट्रीय विजेता जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला 19-11,0-22 व 25-0 असे हरविले व आपल्या पहिल्या जिल्हास्तरीय विजेतेपदावर नाव कोरले. पहिला सेटमध्ये 7 व्या बोर्डाअखेरीस विकासकडे केवळ 14-11 अशी तीन गुणांची आघाडी होती. परंतु 8 बोर्डात योगेशच्या डावाची सुरूवात असतानाही विकासने आक्रमक खेळ करत 5 गुण वसूल केले व 19-11 असा पहिला सेट जिंकून घडी घेतली. दुसर्या सेटमध्ये अनुभवाच्या जोरावर योगेशने बाजी मारली खरी पण तिसर्या सेटमध्ये तो विकासला लगाम टाकू शकला नाही. तिसर्या सेटमध्ये मध्ये योगेशने डोके वर करण्याच्या आत सरळ 3 बोर्डात विकासने 25–0 असे गुण मिळवून आपले पहिले विजेतेपद पटकाविले.
महिला एकेरीचा अंतिम सामना मात्र अतिशय एकतर्फी झाला. आंतर राष्ट्रीय विजेत्या व स्पर्धेतील प्रथम मानांकित इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या आयेशा महम्मदला 25-0,25-12 असे सहज नमवून या गटाचे विजेतेपद पटकाविले. काजलचे या स्पर्धेचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले.
अंतिम निकाल
पुरुष एकेरी उपांत्य फेरी विकास धारिया (मुंबई महानगरपालिका ) विजयी विरुद्ध महम्मद साजिद ( जैन इरिगेशन ) 25-10,25-19. योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ) विजयी विरुद्ध प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) 25-17,13-25 ,25-16. महिला
एकेरी उपांत्य फेरी : आयेशा महम्मद ( जैन इरिगेशन ) विजयी विरुद्ध प्रीती खेडेकर ( पी सी डी ए नेव्ही ) 9-16,13-12 व 25-1. काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) विजयी विरुद्ध नीलम घोडके ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगाव ) 21-12, 25-1.