काजळीने बरबटलेली पण ‘ती’

0

खरे तर कोणीही व्यक्ती दुसर्‍या जिवंत व्यक्तीला विकत कसे घेऊ शकते या प्रश्‍नाने आश्‍चर्य वाटले असेल तर मानवी तस्करीची माहिती जरूर घ्यावी. जगातील बहुतांश पीडित स्त्रियांच्या दु:खाला कारणीभूत ठरणारी मानवी तस्करी हा आजच्या काळातला सर्वात मोठा गंभीर प्रश्‍न बनला आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग अर्थात मानवी तस्करीला आजमितीस कोणताही देश पूर्णपणे थांबवू शकलेला नाही. मानवी तस्करीला बळी पडणार्‍यांमध्ये स्त्री-पुरुष दोन्ही आहेत. मात्र, त्यातही स्त्रिया व बालिकांचे प्रमाण व त्यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण भयावह आहे. भारताची स्थिती काही वेगळी नाही. आपल्या देशात तर स्त्रियांना देवीचा मान देऊन तिचा सन्मान करण्यात येतो व तिला मातृशक्ती म्हणून गौरवण्यात येते त्याच भारतभूमीत स्त्रियांची अतिशय वाईट स्थिती आहे हे आजूबाजूला घडणार्‍या घटनांमधून आणि विकृतींवरून स्पष्ट होत आहे.

भारतात गेल्या वर्षभरात महिला आणि बालकांच्या तस्करीत 25 टक्के वाढ झाल्याचे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की वर्ष 2016 मध्ये सुमारे 20 हजार महिला आणि बालकांची तस्करी झाली. या वर्षात तस्करीच्या 19,223 प्रकरणांची नोंदणी झाली. त्याच्या मागील वर्षी ही संख्या 15,448 एवढी होती. महिला व बालविकास मंत्रालयाने गुरुवारी संसदेत ही माहिती सादर केली. या अहवालानुसार, यातील सर्वाधिक म्हणजे 15,448 प्रकरणे पश्‍चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आले. पश्‍चिम बंगालची सीमा बांगलादेश आणि नेपाळला लागून आहे. या दोन्ही देशांतून या राज्यात ही तस्करी केली जाते. राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार वर्ष 2016 मध्ये महिला व बालकांच्या तस्करीची प्रकरणे जवळपास तेवढीच होती. गेल्या वर्षी सुमारे 9,104 बालकांची तस्करी झाली. त्याच्या मागील वर्षीच्या तुलनेत ही 27 टक्के वाढ होती तसेच या काळात 10,119 महिलांची तस्करी झाली. ते 2015 च्या तुलनेत 22 टक्के अधिक होते. यावर कोणाचेही अंकुश नसल्याने हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बालकांच्या तस्करीबाबतीत पश्‍चिम बंगालनंतर राजस्थान तर महिलांच्या तस्करीमध्ये महाराष्ट्राचे स्थान सातवे आहे. मानवी विशेषतः महिला तस्करी खूप कारणांसाठी केली जाते. त्यातले प्रमुख कारण आहे गुलामगिरी. माणसांना गुलाम बनवून भारत, ब्रिटन, अमेरिका, रशिया, चीन अशा व इतर मोठ्या देशांमध्ये विकायले हा यातला प्रमुख धंदा. दुसरे कारण म्हणजे देहविक्री. जबरदस्तीचे लग्न या प्रकाराला अनेक मुली व स्त्रिया बळी पडतात. पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण कमी असणार्‍या राज्यात म्हणजे उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा, राजस्थानसारख्या या राज्यांमध्ये परप्रांतीय स्त्रिया सर्रास वधू म्हणून विकत घेतल्या जातात. विकत घेणारा पुरुष त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न लावतो आणि हे एवढ्यावरच थांबत नाही तर त्या कुटुंबातील प्रत्येक पुरुष या विकत घेतलेल्या स्त्रीचे लैंगिक शोषण करतो. आज अनेक आश्रमशाळा आणि मुलींचे पुनर्वसन केंद्र आहेत तेथेही काही ठिकाणी मुलींवर अन्याय होतो. मुलींची तस्करी थांबवायची असेल, तर मुलींसाठी स्वतंत्र योजना हव्या आणि या योजनांची पूर्णपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात पूर्णवेळ महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती नाही. महिलांसाठी वेगळा विभाग स्थापन करण्यात येणार होता तोही अद्याप झालेला नाही तसेच आज पोलिसांकडे इतर अनेक गोष्टी असल्यामुळे कधी कधी त्यांच्याकडून घरगुती तक्रारींवर फॉलोअप घेतला जात नाही. हे सगळे थांबवायचे असेल, तर जिल्हा पातळीवर, ग्राम पातळीवर पोलीस तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे असे मला वाटते.
सीमा महांगडे – 9920307309