गुन्ह्यानंतर अवघ्या 24 तासात आवळल्या नवी मुंबईतील आरोपी व्यापार्याच्या शहर पोलिसांनी मुसक्या ; आरोपीला दोन दिवसाची कोठडी ; 13 हजार 660 किलो काजू विक्रीनंतर रक्कम देण्यास टाळाटाळ
भुसावळ- तालुक्यातील कंडारीतील रहिवासी व काजू कंपनी मालकाचा विश्वास संपादन करून नवी मुंबईच्या व्यापार्याने 13 हजार 660 किलो काजू खरेदी करूनही 77 लाख 74 हजारांची रक्कम अदा न केल्याने शहर पोलिसात 24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार होवू नये यासाठी पोलिसांनी बातमी बाहेर येवू न देता सापळा रचून अवघ्या 24 तासात नवी मुंबईतून व्यापार्याच्या मुसक्या आवळल्या. दीपक सुरेश पेंढणेकर (रा. रमाई निवास जीमी टावर जवळ, तीनटाकी, कोरपरखैरणी, नवी मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मुंबईच्या व्यापार्याविरुद्ध गुन्हा
कंडारी गावातील विष्णू नगर भागातील प्लॉट नं. 56 मधील रहिवासी देवांग महेद्र शहा यांचा काजूचा कारखाना आहे. शहा यांच्याशी नवी मुंबईतील आरोपी तथा व्यापारी असलेल्या दीपक पेंढणेकर याने जवळीक साधून सुरुवातीला 36 लाख रुपये आगावू जमा करून शहा यांच्या देवांग एंटरप्राईजेस येथून काजू खरेदीला सुरुवात केली. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2018 ते 22 जानेवारी 2019 या कालावधीत वेळोवेळी काजू खरेदीबाबत ऑर्डर देवून 13 हजार 660 किलो काजू खरेदी केला मात्र शहा यांनी बिलाबाबत पेंढणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिसाद देत नसल्याने व टाळाटाळ करीत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार अर्ज दिला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्याशी संवाद साधून 24 रोजी रात्री गुन्हा दाखल केला.
मुंबईहून आवळल्या मुसक्या
शहर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला असलातरी आरोपी पसार न होण्यासाठी गुन्ह्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांपासून दडवून ठेवण्यात आली तर पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एन.एस.सूर्यवंशी, हवालदार मोहंम्मद अली सैय्यद, सुनील (बंटी) सैदाणे या तीन जणांच्या पथकाने कोपरखैरणी (नवी मुंबई) येथील पोलिस ठाण्यात जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेत आरोपी तथा व्यापारी असलेल्या दीपक पेढणेकर याच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळून भुसावळात आणले. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.