बारामती । बारामती-इंदापूर हा राज्यमहामार्ग माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून जातो. या महामार्गाची काटेवाडीत चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे येथून वाहन चालविणेही कठीण होऊन बसले आहे. बारामतीनजीकच्या मारुतीचा ओढा येथील पुलाचे काम होऊन अवघे 6 महिने झाले आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजुला 200 फुटावर कमीतकमी तीन ते चार हजार मोठे खड्डे पडले आहेत. काटेवाडी एसटी स्टँडनजीकचा रस्त्याही खड्ड्यात गेला आहे.
नानरिकांची गैरसोय
अवघ्या आठ ते नऊ वर्षापूर्वी बारामती ते भवानीनगर या बारा किलोमीटरच्या रस्त्यासाठी विशेष निधीतून काम करण्यात आले होते. या कामात डांबराऐवजी ऑईल वापरले गेल्याचा गंभीर आरोप केला गेला. या आरोपानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बारामती उपविभाग कार्यालयात कोणताही खुलासा केला नाही. हे आश्चर्यजनक मानले जाते. काम झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात हा बारा किलोमीटरचा रस्ता उखडला गेला होता. भवानीनगर काटेवाडी या परिसरातील विद्यार्थी व कामगार मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये येत असतात. खराब रस्त्यांमुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार
या परिस्थितीनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक निधीतून बांदलवाडी ते भवानीनगरच्या अलिकडील मासाळवाडी या सहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. या कामाला अवघी चार वर्षे पूर्ण होत आली. मात्र चारच वर्षात या रस्त्याची निकृष्ट कामामुळे चाळण झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे व सर्वोच्च्य न्यायालयाचा अवमान करीत बांधलेले जागोजागचे गतिरोधक यामुळे या रस्त्यावरची वाहतूक धोकादायक बनली आहे. कामगार वर्ग हा दुचाकीवरून प्रवास करीत असल्यामुळे मणक्याचे आजार होत आहेत. अशी तक्रारही या कामगारांनी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
हा रस्ता राज्यमहामार्ग असूनदेखिल जागोजागी गतिरोधक उभारले गेले आहेत. या मार्गावरून इंदापूर बारामती व अकलूज बारामती अशी मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. तरीही या रस्त्याच्या दर्जाकडे सार्वजनिक बांधकामविभाग गंभीरपूर्वक पाहत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.