काठी अ‍ॅडव्हान्स मिळाल्याने भारावले सफाई कर्मचारी

0

भुसावळ। स्वच्छता कर्मचारी हे पालिका परिवारातील सदस्य असून गोगानवमीनिमित्त त्यांना अग्रीम (अ‍ॅडव्हान्स) मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळेल, असा आशावाद नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केला. पालिकेतील 288 कर्मचार्‍यांना गोगानवमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी दुपारी पालिकेच्या सभागृहात प्रत्येकी 10 हजारांप्रमाणे अग्रीमचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की, पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना त्यांना त्यांच्या हक्काचा अ‍ॅडव्हान्स मिळणे हा त्यांचा हक्कच आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांना रोख रक्कम हातात देण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केले. यापूर्वीदेखील कर्मचार्‍यांना एकरकमी पैसे देण्यात आले आहेत.

पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी
उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी नगराध्यक्षांनी कर्मचार्‍यांना रोख स्वरूपात अ‍ॅडव्हान्स देण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. सोमवारपर्यंत कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात पगाराची रक्कमही जमा होईल, असा आशावाद व्यक्त केला. प्रास्ताविकात कामगार नेता राजू खरारे यांनी नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांच्या काळात अ‍ॅडव्हान्स केव्हा व कशा पद्धत्तीने दिला जात होता याची आठवण त्यांनी करून दिली. पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. व्यासपीठावर गटनेता मुन्ना तेली, गिरीश महाजन, वसंत पाटील, किशोर पाटील, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, परीक्षीत बर्‍हाटे, कामगार नेते राजू खरारे व मोहन घारू आदींची उपस्थिती होती.