पुणे । कॅम्प परिसरात रस्त्यावर राहणार्या लष्करातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बाली यांचा गुरुवारी (दि.1 फेब्रुवारी) सिमेंटचे ब्लॉकने डोक्यात मारहाण करत खून केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावत एका तरुणाला अटक केली आहे. केवळ सिगरेट पेटवण्यासाठी काडेपेटी दिली नाही म्हणून त्याने कप्तान बाली यांचा खून केल्याचे कबूल केले आहे.
रॉबिन अंथोनी लाझरस (21) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाबुराव वाघमारे (25, सेक्युरीटी गार्ड) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर वाघमारे हे घटनेच्या दिवशी कॅम्प परिसरातील डॉ. कोयाजी रोड येथील एका सरकारी निवासस्थानासमोर रात्रपाळीस ड्युटीवर होते. बाली हे याच रस्त्यावर एका तंबूमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान रात्री 12 वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या इसमाने सिमेंट ब्लॉकने मारहाण करून त्यांचा खून केला आणि साथीदारांसह निघून गेला.
बीपीओ कंपनीत नोकरी
रवींद्रकुमार बाली हे सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत असताना त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती खालावल्याने आणि त्यांचा सांभाळ करण्यास कुणीच नसल्याने त्यांनी सैन्यातून निवृत्ती घेतली होती. बाली यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. परंतु सावत्र भावाबरोबर आर्थिक कारणावरून वाद झाल्याने ते सर्व सोडून पुण्यात आले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने ते एका बीपीओ कंपनीत नोकरीस लागले. त्यांनी गृहकर्ज काढून कल्याणीनगर परिसरात घरही घेतले होते. परंतु अचानक बीपीओ कंपनी बंद पडली आणि ते आर्थिक अडचणीत सापडले. गृहकर्जाचे हप्ते न भरल्याने घरही बँकेने जप्त केले. अशातच ते केरळला गेले असताना जोरात झालेल्या पावसात त्यांची महत्त्वाची सर्व कागदपत्रे पावसात वाहून गेली. त्यानंतर ते परत पुण्यात आले आणि कॅम्प परिसरात डॉ. कोयाजी रस्त्यावर राहू लागले होते.