कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे!

0

घोडेगाव । आदिवासी जमातीमधील कातकरी समाजाला इतर समाजाप्रमाणे मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यातील महादेव कोळी ठाकर हा समाज बर्‍यापैकी सुधार व्यवस्थेत आला आहे. कातकरी समाज हा दुर्लक्षित आहे. जंगलात आणि नदीकाठी प्रतिकूल परिस्थितीत हा समाज जगत आहे. जातीचा दाखला हा समाजाची आणि माणसाची ओळख दाखवितो. पुढील काळात तालुक्यातील शासकीय जागा गायरान या आरक्षित करून कातकरी, ठाकर, फासेपारधी या समाजाच्या घरांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिले.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ-शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने कातकरी समाजातील लोकांना जातीचे दाखले, रेशनकार्ड, गॅसजोड, सायकल वाटप करण्यात आले. वळसे पाटील व तहसिलदार रविंद्र सबनिस यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नायब तहसीलदार विजय केंगले, सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जि. प. सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य अलका घोडेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

नायब तहसिलदार विजयराव केंगले यांच्या सुचनेवरून कातकरी समाजातील 55 लोकांना जातीचे दाखले, 17 कुटुंबांना गॅस जोडणी, 7 रेशन कार्ड, 4 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. घोडेगाव येथील नागरी सुविधा केंद्राने पुढाकार घेऊन जातीचे दाखले तयार करून कातकरी समजाला त्याचे वाटप करण्यात आले.